मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावतच्या चाहत्यांनी काही कमी नाही, पण तिचे घरचे मात्र तिच्या जन्माने खुश नव्हते. त्यांच्यासाठी ती नकोशी होती, असं वक्तव्य कंगनाने नुकतंच एका कार्यक्रमात केलंय.
मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेल्या कंगनानं केवळ आपल्या हिंमतीवर आजवर भरपूर यश मिळवलंय. पण आजही कंगनाच्या काही जुन्या आणि दु:खद आठवणी तिच्या मनात ताज्या आहेत. कंगनाला मोठी बहिणी रंगोली आणि छोटा भाऊ अक्षत आहे.
कंगनाच्या आई-वडिलांना तिच्या बहिण रंगोलीच्या आधीही एक मुलगा झाला होता... मात्र, जन्मानंतर दहा दिवसांतच ते बाळ दगावलं... त्यामुळे, कंगनाच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर कंगनाची मोठी बहिण रंगोलीचा जन्म झाला, त्यांना खूप आनंद झाला. रंगोलीची चांगली काळजीही घेण्यात आली.
पण, ज्यावेळी कंगनाचा जन्म झाला तेव्हा तिच्या आई-बाबांना विशेषत: आईला हे स्वीकारणं कठीण जात होतं की, एक मुलगी असतानाच घरात आणखी एका मुलीचा जन्म झाला. कंगनाच्या घरी आलेल्या पाहुण्यांनादेखील नको असलेल्या या दुसऱ्या मुलीची अर्थातच कंगनाची कहाणी सांगितली जायची. जे वारंवार ऐकणं कंगनासाठी त्रासदायक असायचं.
मुलगा-मुलगी असा भेदभाव करणाऱ्या समाजाचा कंगना कायमच तिरस्कार करते आणि असे जुने विचार ती मानत नाही. आजच्या जगात मुली या मुलांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं कंगनाचं ठाम मत आहे.