नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी 'पीके' या चित्रपटाची स्तुती केली आहे. दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेमुळे पीके चर्चेत आला आहे. आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक दिमाखदार आणि साहसी चित्रपट असल्याचे आडवाणी यांनी म्हटले आहे.
राजकुमार हिरानी यांचे दिग्दर्शन असलेला 'पीके' हा चित्रपट आडवाणी यांनी नुकताच पाहिला. त्यांना हा चित्रपट आवडला असून, जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा अशी त्यांची इच्छा आहे.
आडवाणी म्हणतात, राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांचे या दिमाखदार आणि साहसपूर्ण चित्रपटाबद्दल अभिनंदन! भारतासारख्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण देशात जन्माला आलो हे आपले सौभाग्य आहे. जाती, समुदाय, भाषा, क्षेत्र, धर्म यांमुळे देशाचे ऐक्य कमी होऊ नये याची काळजी घेणे ही प्रत्येक देशभक्ताची जबाबदारी आहे.
संघटित धर्म, देव आणि बाबा यांच्यावर या चित्रपटात कडक टीका करण्यात आली आहे. आपल्या देशासाठी नैतिक आचरण हा धार्मिकता, आध्यात्मिकता यांचा एक सखोल स्त्रोत आहे. जे लोक धर्माचा दुरुपयोग करतात ते देशाच्या ऐक्याला धक्का पोचवितात, असे मत आडवाणी यांनी व्यक्त केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.