मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता राहुल आणखी अडचणीत येणार असल्याचं दिसतंय... त्याचं कारण म्हणजे राहुल राज सिंग याची एक्स गर्लफ्रेंड सलोनी शर्मा हिनं केलेला खळबळजनक खुलासा...
प्रत्युषाला राहुलच्या एक्स गर्लफ्रेंडनं सलोनीनं मारहाण केल्याचं तिच्या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली होती. हे खरं असल्याचं सलोनीनं कबूल केलंय.
परंतु, राहुल आणि प्रत्युषानं आपल्याला केलेल्या मारहाणीनंतरच आपणही प्रत्युत्तर म्हणून त्यांच्यासोबत हाणामारी केल्याचं सलोनीनं म्हटलंय.
सलोनीनं दिलेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारी रोजी सलोनी कांदिवली स्थित फ्लॅटवर गेली होती... सलोनीसोबत नातं तोडून राहुल प्रत्युषासोबत या फ्लॅटमध्ये राहायला आला होता. सलोनीनं केलेल्या दाव्यानुसार, राहुलच्या आयुष्यातील 'दुसरी महिला' प्रत्युषा होती.
सलोनीच्या माहितीनुसार, राहुलनं दिलेल्या दग्यानंतर मी खूप अस्वस्थ होते. मला यातून पुढे जायचं होतं. परंतु, माझे पैस राहुलकडे अडकलेले होते.
राहुलला एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्यासाठी सलोनीनं आणि तिच्या वडिलांनी पैसे दिले होते. परंतु, जेव्हा सलोनीनं राहुलकडे पैशांनी मागणी केली... त्यानं तिला टाळण्याचा प्रयत्न केला.
सलोनी पैसे घेण्यासाठी जेव्हा राहुलच्या घरी दाखल झाली त्यावेळी राहुल-प्रत्युषानं तिला मारहाण केली... आणि तिला फ्लॅटमधून बाहेर काढलं. परंतु, ती तिथून हलत नाही हे पाहून या दोघांनी तिला पुन्हा मारण्यास सुरुवात केली तेव्हा सलोनीनं त्यांच्यावरही हात उगारला.
याबद्दल सलोनीनं बांगडनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. तेव्हा तेच पोलीस होते जे आज प्रत्युषा आत्महत्या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे त्यांनाही अगोदरच्या घटना माहीत आहेत, असा दावा सलोनीनं केलाय.
२०११ मध्ये पहिल्यांदा भेटल्यानंतर राहुल-सलोनीची प्रेमकहाणी सुरू झाली होती. दोघं पाच वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर राहुल आणि प्रत्युषाची भेट झाली... आणि राहुलनं सलोनीशी नातं तोडलं. महत्त्वाचं म्हणजे, ही गोष्ट राहुलच्या कुटुंबीयांनाही माहित होती.
राहुल अगोदरपासून विवाहीत होता, याची आपल्याला कल्पना नव्हती असंही सलोनीनं म्हटलंय. सलोनीच्या या दाव्यांमुळे अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या, त्यांचा आर्थिक फायदा उठवणाऱ्या राहुलच्या अडचणी वाढणार असं दिसतंय.