झी मराठीवर कट्यार...चं वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर

श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन याच्या जोरावर गेल्यावर्षी रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा चित्रपट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. केवळ महाराष्ट्रच नाही तर देश आणि परदेशातीलही रसिकांच्या मनावर कट्यार...ने मोहिनी घातली तसेच अनेक मानाचे पुरस्कारही पटकावले. रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही कलाकृती आता टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून रसिकांना बघायला मिळणार आहे. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियरमध्ये येत्या २६ जूनला सायंकाळी ७ वा. हा चित्रपट प्रसारित होणार आहे.

Updated: Jun 21, 2016, 08:15 PM IST
झी मराठीवर कट्यार...चं वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर title=

मुंबई : श्रवणीय संगीत, बहारदार अभिनय आणि उत्कृष्ट दिग्दर्शन याच्या जोरावर गेल्यावर्षी रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारा चित्रपट म्हणजे ‘कट्यार काळजात घुसली’. केवळ महाराष्ट्रच नाही तर देश आणि परदेशातीलही रसिकांच्या मनावर कट्यार...ने मोहिनी घातली तसेच अनेक मानाचे पुरस्कारही पटकावले. रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ही कलाकृती आता टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून रसिकांना बघायला मिळणार आहे. झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियरमध्ये येत्या २६ जूनला सायंकाळी ७ वा. हा चित्रपट प्रसारित होणार आहे.

सत्तरच्या दशकात रंगभूमीवर आलेल्या पुरूषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पं.वसंतराव देशपांडे यांनी साकारलेली खाँसाहेबांची व्यक्तिरेखा आणि त्यांची गायकी, अभिषेकी बुवांचं मनाला मोहवून टाकणारं संगीत कट्यार.. नाटकाला अमाप लोकप्रियता देऊन गेलं. याच नाटकावर आधारित चित्रपट रूपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचललं ते दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे आणि निर्माते झी स्टुडिओजने. हा चित्रपट गेल्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ‘घेई छंद मकरंद’, ‘तेजोनिधी लोहगोल’, ‘सुरत पिया की’ सारख्या जुन्या रचना नव्या स्वरूपात रचण्यात आल्या आणि त्यासोबतीनेच तयार केलेल्या ‘दिल की तपीश’, ‘मन मंदिरा’, ‘सूर निरागस हो’ या नव्या रचनांनाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

दोन घराण्यातील गायकीच्या संघर्षावर कट्यार..चं कथानक बेतलेलं आहे. आपल्या गायकीने संपूर्ण दरबारासहित राजांचं आणि प्रजेचं मन जिंकणारे पंडित भानुशंकर शास्त्री हे गायक म्हणून जेवढे महान तेवढेच माणूस म्हणूनही. आपल्या स्वर्गीय सुरांच्या जोरावर पंडितजीना राजगायक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. पंडितजींना मिळणारा हा बहुमान खॉंसाहेबांच्या मनात सलतोय आणि याच इर्षेपोटी ते कुटील डाव रचून हे पद स्वतः मिळवतात. पंडितजींवर झालेल्या या अन्यायाचा बदला घेण्यासाठी त्यांचा शिष्य सदाशिव पुढे येतो आणि मग सुरू होतो सदाशिव आणि खाँसाहेबांमधला संघर्ष. 

चित्रपटात पंडितजींची व्यक्तिरेखा शंकर महादेवन, खॉंसाहेबाची व्यक्तिरेखा सचिन पिळगावकर यांनी तर सदाशिवची भूमिका सुबोध भावे यांनी साकारलीये. याशिवाय चित्रपटात अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री आणि साक्षी तन्वरसह इतरही अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

कट्यार काळजात घुसली चित्रपटाचं सर्वात मोठं बलस्थान ठरलं ती चित्रपटातील गाणी. काही जुन्या रचनांना नव्या सूर तालाने सजवण्याची आणि इतरही नवी गाणी देण्याची कामगिरी केली. शंकर-एहसान-लॉय या बहुगुणी संगीतकार त्रयींनी. कट्यारच्या संगीताचं गारूड अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, दिव्यकुमार, अरिजीत सिंह यांच्या बहारदार गायकीने ही गाणी सजली होती. मागील वर्षी झी गौरवसह अनेक महत्त्वाच्या पुरस्कार सोहळ्यात कट्यारच्या संगीताने बाजी मारली होती. यातील ‘अरूणी किरणी’ गाण्यासाठी तर गायक महेश काळे हे यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले.  

मराठी रंगभूमीवरील हे मानाचं पान रूपेरी पडद्यावर आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला नाटकाइतकाच उदंड प्रतिसाद दिला. आता झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून यातील अभिनय आणि संगीताची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे.