झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर

झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर झाला आहे. अपंगमित्र नसीमादीदी हुरझूक यांना हा सन्मान मिळाला आहे.

Updated: Aug 17, 2016, 05:04 PM IST
झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर title=

मुंबई : झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर झाला आहे. अपंगमित्र नसीमादीदी हुरझूक यांना हा सन्मान मिळाला आहे.

समाजासाठी देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील काही कर्तृत्ववान महिलांचा तसेच एका सामाजिक संस्थेला दरवर्षी झी मराठीतर्फे उंच माझा झोका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. कोल्हापूर येथे ‘हेल्पर्स फॉर हॅंडीकॅप’ या संस्थेच्या माध्यमातून अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या अपंगमित्र नसीमादीदी हुरझुक यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

यासोबतच ग्रामस्वछतेचे ध्येय बाळगून त्यासाठी कार्य करणा-या ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला’ सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १९ ऑगस्ट २०१६ ला हा पुरस्कार प्रदान सोहळा डोंबिवली येथे सावित्रीबाई फुले सभागृह येथे संपन्न होत असून २८ ऑगस्टला हा सोहळा झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

मनोरंजन आणि प्रबोधन यांची उत्कृष्ट सांगड घालणा-या झी मराठी या महाराष्ट्रातील अग्रेसर वाहिनीने गेल्या पंधरा वर्षांत विविध दर्जेदार कार्यक्रमांचा नजराणा आपल्या रसिकांना दिला. दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा राखत झी मराठीने सतत वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखिल राबवले आहेत. याच परंपरेतून उंच माझा झोका या पुरस्काराची संकल्पना गेल्या तीन वर्षांपासून झी मराठीकडून राबवण्यात येत आहे. 

कोकणात गृहिणीचं आरोग्य, पर्यावरण आणि रोजगार याबरोबरच ग्रामस्वच्छता आणि ग्रामविकासाचे ध्येय घेऊन काम करणारे ध्येयनिष्ठ दांपत्य म्हणजे डॉ. प्रसाद देवधर आणि डॉ. हर्षदा देवधर. या डॉक्टर दाम्पत्याने आपला डॉक्टरी पेशा सांभाळत असतानाच समाजसेवेचं आणि ग्रामविकासाचं व्रत अंगीकारलं आणि गावाच्या विकासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना केली. आज भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने बायोगॅस प्रकल्प राबवत जिल्ह्यातील सुमारे पाच हजार घरे धूरमुक्त केलीयत. बायोगॅस प्रकल्पाबरोबरच ग्रामविकासाच्या विविध योजना राबवत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. प्रसाद देवधर आणि डॉ. हर्षदा देवधर यांच्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला यावर्षीचा सामाजिक संस्थेचा उंच माझा झोका पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या पुनर्वसनासाठी गेली चार दशके अथक परिश्रम घेणा-या नसीमा हुरझूक यांना यंदाच्या उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 

झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कारांसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख या तीन मान्यवरांनी पुरस्काराच्या निवड समितीचे मानद सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावली.