राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगावमधून निवडणूक जिंकली आणि आठव्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. पण त्यांचा हा विजय काठावर झाला होता. मात्र आज अचानक ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान भेटीनंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी यामागील कारण सांगितलं.
शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "आज शरद पवार साहेबांशी भेट झाली. यशवंत चव्हाण प्रतिष्ठानची बैठक होती, त्यात सदस्य म्हणून आम्ही उपस्थित होतो. त्यांच्यासोबत राजकीय काहीही चर्चा झाली नाही. प्रतिष्ठानच्या संदर्भात चर्चा झाली नाही. काय घडलं याबद्दल चर्चा झाली. माझ्या स्वत:च्या निवडणुकीबद्दल काही चर्चा झाली नाही", अशी माहिती त्यांनी दिली.
"ते नेमकं काय बोलले हे मी सांगणं उचित नाही. ही वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं मत त्यांनी मांडलं. मी त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेतला," असंही त्यांनी सांगितलं. पार्थ पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत शरद पवारांचे काही आमदार पक्षात प्रवेश करण्यासंबंधी सूचक विधान केलं आहे. त्यावर ते म्हणाले की, "माझ्याशी तरी या बाबतीत कोणाचं बोलणं झालेलं नाही. कोण कोणाशी बोललं आहे, येणार की नाही याबद्दल आता बोलणं उचित नाही. तशी कुठे चर्चा झाली असेल असं वाटत नाही".
"निवडणूक मॅच फिक्सिंग करुन होत नाहीत. सरळ निवडणूक झाल्या आहेत. ज्यांचा उमेदवार विजयी झाली तोच विधानसभेत येणार," असं सांगत त्यांनी विरोधकांचे दावे फेटाळले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "अजून तशी चर्चा नाही,. असा विचार समोर आलेला नाही. अजून बऱ्याच राजकीय गोष्टी घडायच्या बाकी आहेत. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ निवडायचं आहे. विधानसभा हिवाळी अधिवेशन झालं पाहिजे. कोणी चर्चा केली तर तो तेव्हाचा विषय आहे. कोण मुख्यमंत्री होणार हे आता युतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील".