लैंगिक जीवनात होऊ नका वैफल्यग्रस्त...

लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे

Updated: May 14, 2013, 07:48 AM IST

www.24taas.com
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे; पण मानवतेवर प्राण्यांमध्ये असते, तशी मानवामध्ये ह्या प्रेरणेचे नियमन करण्याची काही नैसर्गिक यंत्रणा नाही. मानवामध्ये ह्या प्रेरणेचे कार्य व आविष्कार प्राण्यांप्रमाणेच पुनरुत्पादनापुरताच मर्यादित असता, तर लैंगिक शिक्षण अनावश्यक ठरले असते. उलट असे दिसून येते, की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानव पुनरुत्पादनाव्यतिरिक्त, केवळ लैंगिक सुखासाठीदेखील त्या प्रेरणेचा आविष्कार करू लागला.
सामाजिक जीवनात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे समाजाला नीतिनियम, निर्बंध, निषेध वगैरेंद्वारा ह्या प्रेरणेचे नियमन करणे आवश्यक झाले. ही सामाजिक नियंत्रणे विवेकपूर्वक पाळली गेली पाहिजेत; म्हणून लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. लैंगिक प्रेरणेच्या संदर्भातील सामाजिक निर्बंधांमुळे प्रजननयंत्रणेविषयी अज्ञान निर्माण होऊ शकते. जननेंद्रियांविषयी अतिगुप्तता बाळगण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. कडक सामाजिक निषेधाच्या भयाचे दडपण येते.

लैंगिक व्यवहारविषयी गैरसमजुती निर्माण होऊ शकतात आणि अशा विविध कारणांमुळे अनेकदा स्त्री-पुरुष स्वतःची यथोचित लैंगिक भूमिका समजू शकत नाहीत आणि लैंगिक जीवनाच्या निरामय आनंदास मुकतात. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा ह्या प्रेरणेसंबंधीच्या दमनविषयक अपसमजांमुळे पौगंडावस्थेततील मुलांमध्ये मानसिक ताण, वैफल्य, न्यूनगंड व त्यामुळे होणाऱ्या मानसिक व मनोकायिक विकृतींचा उद्‌भव होतो. योग्य लैंगिक शिक्षणाने हे सर्व टाळता येण्यासारखे आहे आणि ह्यामुळे लैंगिक शिक्षण आवश्यक झाले आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.