ऑडीट विधानसभा मतदारसंघ - वरोरा-भद्रावती, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक आमदाराला जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचे भाग्य साधारण १७ वर्षांनी लाभले. अर्थात जिल्ह्यातील आमदार आणि तोही २० वर्षे आमदारकी भोगलेला म्हटल्यावर मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या. संजय देवतळे हे येथील आमदार. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ.

Updated: Oct 1, 2014, 07:09 PM IST
ऑडीट विधानसभा मतदारसंघ - वरोरा-भद्रावती, चंद्रपूर  title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक आमदाराला जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचे भाग्य साधारण १७ वर्षांनी लाभले. अर्थात जिल्ह्यातील आमदार आणि तोही २० वर्षे आमदारकी भोगलेला म्हटल्यावर मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या. संजय देवतळे हे येथील आमदार. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ.

संपूर्ण देशाला कुष्ठरोग्यांच्या सन्मानासाठी हक्काचे घर देणारे पद्मश्री बाबा आमटे यांचे आनंदवन याच मतदारसंघात आहे. हिंदू-बौद्ध-जैन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा मतदारसंघ ओबीसिबहूल मतदारसंघ आहे. 

मतदारसंघात...
कुणबी समाजाची एकगठ्ठा मते , ७०  टक्के ग्रामीण तोंडवळा , वरोरा आणि भद्रावती या दोन नगरपालिका आहेत.

वर्धा नदीच्या बारमाही पाण्यामुळे सुजलाम झालेला हा भाग. विदर्भाचे पॉवर हब आहे. डझनभर औष्णिक वीज केंद्रे प्रस्तावित आहेत.  शेतकरी कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या या  मतदारसंघात सुमारे २ लाख ६८ हजार ३६९ मतदार आहेत. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संजय देवतळे यांचा अवघ्या ३ हजार ७४० मतांनी निसटता विजय झाला. संजय देवतळे यांची ही आमदारकीची चौथी टर्म. राज्य सरकारमध्ये कॅबिनेटमंत्रीपद आणि चंद्रपूरचे पालकमंत्री, अशी दुहेरी पदे संजय देवतळे यांना मिळाली. चंद्रपूर लोकसभेसाठीही देवतळे यांना तिकीट मिळाले. मात्र मतदारसंघातील नाराजीचा फटका देवतळे यांना बसला आणि भाजपचे हंसराज अहिर २ लाख ३६ हजार २६९ एवढ्या अभूतपूर्व मताधिक्याने विजयी झाले.

काय झालीत विकासकामे?
नागपूरला जोडणारा चौपदरी महामार्ग ,वरोरा शहरातील रेल्वे उड्डाणपूल, कोळसा खाणीत जमिनी गेलेल्या शेतक-यांना वाढीव मोबदला,वर्धा नदीवर बांधलेला मोठा पूल,वरोरा शहरातील गांधीसागर तलावाचे सौदर्यीकरण,खेड्यांमध्ये सिमेंट रस्ते, कोल्हापुरी बंधारे, शेततळी निर्मिती आदी विकासकामे केल्याचं देवतळे सांगतात. 

विकासकामांत अपयश...
देवतळे यांनी तब्बल २० वर्ष आमदारकी उपभोगली मात्र विकासकामे करण्यात ते सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांचे विरोधक करताहेत. यात कोळसा खाणीमुळे विस्थापित झालेल्यांना रोजगार नाही , शहर व ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच आजारी  आहे. , शहरी भागाचे योग्य नियोजन नाही , ७० टक्के शेतीचा भाग मात्र सिंचन योजना नाहीत, सांस्कृतिक मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात नाट्यगृह नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येतेय. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला या मतदारसंघाने  27 हजार 389 मतांची आघाडी दिली आहे. शिवसेनाला इथे सातत्याने पराभव स्विकारावा लागल्याने भाजप या जागेवर दावा सांगत आहे. तर मनसेकडूनही इथे डॉ. अनिल बुजोने मैदानात आहेत. 

पालकमंत्री संजय देवतळे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभव, मोदींची लाट, राष्ट्रवादीची नवी फिल्डिंग लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आप उमेदवारासाठी उघडपणे केलेले काम या सगळ्या पार्श्वभूमीवर यावेळी उमेदवार नेमके कोण असतील याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.