पुणे : आयसीसच्या जाळ्यात पुण्यातली एक शाळकरी मुलगी सापडल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय. या कटू सत्यामुळे अनेकांना हादरा बसलाय.
अवघ्या १६ वर्षांची ही शाळकरी मुलगी आहे. ही मुलगी आयसीसमध्ये भरती होण्यासाठी इराकला जाण्याच्या तयारीत होती. पण, वेळीच या गोष्टीचा सुगावा लागल्यानं सुरक्षा यंत्रणांनी तिला रोखलंय.
सोशल नेटवर्किंगच्या साहाय्यानं आयसिसच्या दहशतवाद्यांनी या मुलीशी संपर्क साधल्याचं उघड झालंय. पुण्यातल्या एका इंग्रजी माध्यमातील शाळेत ही मुलगी सध्या शिकतेय.
नुकतीच काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन'मधील इंजिनिअरकडून दहशतवादीविरोधी पथकाच्या हाती ही माहिती लागली होती.
इसिसमध्ये भरती करून या मुलीचाही वापर 'सुसाईड बॉम्बर' म्हणून करण्यासाठी तिला इराकला नेण्यात येणार होतं.
उल्लेखनीय म्हणजे, याआधी ठाण्यातले चार तरुण इसिसमध्ये भरती झाल्याची माहिती आहे. यातील एक तरुण मारला गेल्याची माहिती मिळतेय. तर आणखीन एक तरुण भारतात परतलाय. सध्या तो एटीएसच्या ताब्यात आहे.