कार्यशाळेला ५० टक्क्याहून अधिक नगरसेवकांची दांडी

पुणे महापालिकेत निम्म्याहून अधिक नगरसेवक नवीन आहेत. त्यांना महापालिका कामकाजाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 10, 2017, 04:02 PM IST
कार्यशाळेला ५० टक्क्याहून अधिक नगरसेवकांची दांडी title=

(नितीन पाटणकर, झी मीडिया) पुणे : पुणे महापालिकेत निम्म्याहून अधिक नगरसेवक नवीन आहेत. त्यांना महापालिका कामकाजाची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मात्र, या कार्यशाळेला पन्नास टक्क्याहून अधिक नगरसेवकानी दांडी मारली आहे. त्यामुळं पुणेकरांच्या पैशातून कार्यशाळेचा खटाटोप कशाला, असा प्रश विचारला जात आहे. 

पुणे महापालिका सभागृत यावेळी पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. या नवीन नगरसेवकांना महापालिका कामकाजाचा अनुभव नाही. त्यामुळं त्यांना महापालिका कामकाजाची नीट माहिती व्हावी यासाठी खास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पुण्यातल्या यशदा या नामवंत शासकीय संस्थेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. मात्र या प्रशिक्षण शिबिराला अनेक नगरसेवकांनी दांडी मारलीय. अनुपस्थितीसाठी विविध कारणं नगरसेवक देतायत.

पहिल्या दिवशी प्रशिक्षण सुरु झाल्यावर जेमतेम निम्मे नगरसेवक हजार होते. दुपारी जेवणांतर मात्र ही संख्या आणखी घटली. अवघे 50-55 नगरसेवक प्रशिक्षण वर्गात शिल्लक राहिले. दुसऱ्या दिवशीही तीच स्थिती. 

अनुपस्थितीचा विषय असतानाच, या कार्यशाळेतुन खरंच किती माहिती मिळणार, अशी शंका खुद्द नगरसेवक उपस्थित करतायत. कारण, कार्यशाळेत पालिकेचे अधिकारी मार्गदर्शन करतायत. मात्र अधिकारी, विषयाची संपूर्ण आणि सखोल माहिती देत नाहीत असा आरोपच नगरसेवकांनी केलाय.  

कार्यशाळ सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी होती. कार्यशाळेला दांडी मारण्यातही सर्वपक्षीय नगरसेवक होते. नगरसेवकांची कार्यशाळा काही मोफत होणार नाही. त्यासाठी महापालिकेचा निधी खर्च होणार आहे.  त्यामुळं पुणेकरांच्या पैशातून कार्यशाळेचा खटाटोप कशाला असा प्रश्न विचारला जातोय.