पुणे : मकर संक्रांतीच्या गोड मुहूर्तावर मायमराठी भाषेची साहित्यगोडी निर्माण करणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड नगरी आता सज्ज झालीय.
या उद्योगनगरीतल्या हिंदूस्थान ऍण्टिबायोटिक्स कंपनीच्या ४० एकराच्या मैदानावर संमेलनाचा भव्य मंडप मोठ्या दिमाखात उभा राहिलाय. आज दुपारी दोन वाजता ग्रंथ दिंडीनं साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे.
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दिंडीचं पूजन होईल. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघणा-या या दिंडीत २ हजार महिला पारंपारिक वेषात सहभागी होणार आहेत. मंगळागौर, मल्लखांबासह १६ प्रकारच्या पारंपारिक खेळांचा त्यात समावेश असणार आहे.
सायंकाळी पावणे पाच वाजता ध्वजवंदन केलं जाईल. त्यानंतर पाच वाजता मावळते अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर माजी संमेलन अध्यक्षांचा सत्कार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे! विश्व साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे!