ठाणे : लष्कर भरती परीक्षेचा पेपर लिक झाल्यानंतर ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. ठाणे क्राईम ब्रँचनं नागपूरमध्ये केलेल्या कारवाईत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यातही असून हडपसर पोलिसांनी काहींना अटक केली आहे. यात काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
संतोष शिंदे आणि धनाजी जाधव अशी पुण्यात अटक झालेल्या दोघांची नावं आहेत. नागपुरच्या पार्वती नगर इथल्या मौर्य सभागृहात सुमारे 60 परीक्षार्थी थांबले होते. त्यांना प्रत्येकी 3लाख रुपये घेऊन पेपर दिला जात असल्याची बातमी पोलिसांना लागली. पहाटे 4 वाजता ठाणे पोलिसांनी सभागृहात टाकलेल्या छाप्यामध्ये पेपरची प्रत हस्तगत करण्यात आली. ही प्रत आर्मी रिक्रूटमेंट बोर्डाकडे पाठवण्यात आली. तसंच तिथं असलेल्या परीक्षार्थींसह 18 जणांना ताब्यात घेण्यात आलं. नंतर परीक्षार्थींना सोडून देण्यात आलं.
ठाणे पोलिसांनी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सहायक आयुक्त सुरेश भोसले युनिट एकचे विनोद पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत 8 आरोपींना अटक केली.