मुंबई : वीकेंडला लोणावळ्याला जाणा-या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी. भुशी धरण दुपारी तीननंतर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी तीन नंतर वाहनांसाठी प्रवेशबंदी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. त्याचबरोबर शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी लोणावळा गावात जाणाऱ्या लक्झरी बस, मिनीबस, टेंपो ट्रॅव्हलरसह अवजड वाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आलीय.
पावसाळा सुरु झाल्यापासून शनिवारी आणि रविवारी लोणावळ्यात पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. ५५ ते ६० हजार लोकसंख्या असणाऱ्या लोणावळ्यात दर वीकेंडला मोठ्या संख्येनं पर्यटक येतात.
इथल्या रस्त्यांची क्षमता केवळ तीन ते चार हजार वाहनांची असताना वीकेन्डच्या काळात लोणावळ्यातल्या रस्त्यांवर किमान ५० हजार वाहनं असतात. त्यामुळे शहरावर प्रचंड ताण येतो, हे सगळं टाळण्यासाठी भुशी डॅम दुपारी तीन नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.