पंढरपूर : पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'रिंगण' वार्षिकाच्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे बुधवारी (दि.९) सकाळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान मिऴालेले राम शेळके आणि प्रमिला शेळके या कर्नाटकातील वारकरी दाम्पत्यासह पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, माजी आमदार उल्हास पवार, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे, कार्यकारी अधिकारी संजय तेली, पत्रकार सुनील दिवाण, सुनील उंबरे आदि मान्यवर उपस्थित होते.
संतसाहित्याला वाहिलेला रिंगण वार्षिकाचा हा दुसरा विशेषांक आहे. पहिल्या अंकातून संत नामदेवांच्या कार्यकर्तृत्वाचा व्यापक परिचय करून देण्यात आला होता. या अंकाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदा तर नामदेवांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून ८८वे मराठी साहित्य संमेलन नामदेवांच्या कर्मभूमीत म्हणजे पंजाबमधील घुमान येथे होत आहे.
या उपक्रमामागील भूमिका विशद करताना संपादक सचिन परब म्हणाले, सध्या समाजात जातीपातींचे ध्रुवीकरण होताना दिसते. काही प्रवृत्ती आपल्या फायद्यासाठी समाजात मुद्दाम तेढ वाढवताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत समाजाला एकोप्याने, बंधुभावाने राहण्याचा संदेश देणाऱ्या वारकरी संतांच्या विचारांना उजाळा देण्याची गरज आहे. याच भूमिकेतून 'रिंगण' वार्षिक सुरू करण्यात आले. दरवर्षी एका संतांच्या कार्याचा अभ्यास करण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यानुसार यंदा संत चोखोबांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
या वर्षीच्या विशेषांकाविषयी बोलताना संपादक श्रीरंग गायकवाड म्हणाले, 'ज्या संताने आयुष्यभर मानवतेचे गाणे गायले, त्याच्या वाटयाला शेवटपर्यंत उपेक्षाच आली. पूर्वी समाजातील काही कर्मठ प्रवृत्तींनी चोखोबांना दूर ठेवले, तर मधल्या काळात आंबेडकरी चळवळीनेही चोखोबांना नाकारले. आता तर त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. त्यांच्या अभंगरुपी साहित्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
हाल अपेष्टांच्या जगण्यातही वैश्विक दर्जाचं साहित्य लिहिणाऱ्या, मानवमुक्तीचा पहिला उद्गघोष करणाऱ्या या संताच्या कार्याविषयी यंदाच्या अंकात भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, अभय टिळक, ज. वि. पवार, शुद्दोधन आहेर, अरुण खोरे, आदी अनेक मान्यवरांनी लिहिले आहे. यात चोखोबा आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाऊलखुणा शोधणारे रिपोर्ताज, संशोधकांचे लेख आणि 'आम्ही चोखोबा का नाकारतो?' या विषयावरील आंबेडकरी विचारवंतांचे लेख आदी विषयांचा समावेश आहे.
गुरुवारपासून महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील विक्रेत्यांकडे हा विशेषांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी सागर शिंदे (९२२२३८४६७२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अंकाच्या निमित्ताने संत चोखामेळा यांच्या साहित्यावर चिंतन करणारी चर्चासत्रे, कार्यक्रम महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येणार असल्याचे संपादकद्वयांनी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.