पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका दीड वर्षीय चिमुकलीन चपटा सेल गिळल्याची आणि तो सेल पोटात फुटल्याची धक्कादायक घटना घडलीय.
सगळ्यांनीच लहान मुलांची काळजी किती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे हे स्पष्ट करणारीच ही घटना म्हणावी लागेल. सुदैवाने शस्त्रक्रियेनंतर यात त्या चिमुरडीचा जीव बचावलाय पण थोडासा निष्काळजीपणा किती धोकादायक होऊ शकतो हे या घटनेतून अधोरेखित झालंय.
पिंपरी चिंचवडच्या निगडीत ८ नोव्हेंबरला ही धक्कादायक घटना घडलीय. प्रांजल गुंड असं चिमुरडीचं नाव आहे. आई शीतल यांनी टीव्ही लाऊन चिमुकलीच्या हातात खेळण्यासाठी रिमोट दिला.
मात्र, या चिमुकलीने खेळता खेळता रिमोडचे कव्हर काढले आणि त्यातील चपटे सेल गिळले. गुंड कुटुंबीयांनी तातडीनं आकुर्डी येथील स्टार रुग्णालय गाठलं. मात्र, तत्पूर्वीच ते सेल पोटात फुटले होते.
हे सेल बाहेर काढून चिमुकलीचा जीव वाचवण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. दुर्बीणद्वारे चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आलं...