www.24taas.com, मुंबई
ड्रायव्हर व्हायचंय?... मग, मराठी व्याकरणावर द्या भर… ऐकून आश्चर्य वाटलं ना?... पण होय, तुम्हाला ड्रायव्हर होण्यासाठीही तुमचं मराठी व्याकरण सुधारावं लागणार आहे. एव्हढंच नाही तर इतिहास, भूगोल आणि गणितातही पारंगत व्हावं लागणार आहे... कदाचित आत्तापर्यंत लक्ष दिलं नसेल याकडे तर आता द्यायला लागणार आहे... अहो, होय, कारण महाराष्ट्र विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वाहनचालकांच्या रिक्त पदांसाठी जे पेपर काढले जातात त्यात हेच तर प्रश्न विचारले गेलेत.
एमआयडीसीच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या तरुणांच्या हाती पडला तो मराठी व्याकरण, साहित्य, व्याकरण, क्रिडा, भूगोल, संरक्षण, गणितावर आधारित प्रश्नांचा भर असलेला पेपर... मोटारीतील क्लचप्लेट, कार्बोरेटर, रेडिएटरबाबत किंवा वाहन चालवताना पाळावयाचे नियम याबाबत मात्र यात एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. मराठी व्याकरणातील क्रियाविशेषण, उभयवचनी शब्द, विभक्ती प्रत्यय अशा प्रश्नांची सरबत्ती मात्र या पेपरमध्ये करण्यात आली होती.
पडघवली पुस्तकाचे लेखक कोण?...देवधर करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?..इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?...पाण्याखालून मारा करणाऱ्या के-५ क्षेपणास्त्राचा पल्ला किती किमी आहे?...हे आणखी काही विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे नमुने. याबाबत एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराड पोमण यांना विचारण्यात आले असता, ‘कुठल्या पदाकरीता हे पेपर तयार करायचे आहेत त्याची माहिती व शैक्षणिक अर्हताही कळवली होती’ असे त्यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या वेगवेगळ्या कार्यालयातील १३ श्रेणीतील ४४४ पदांसाठी रविवारी राज्यात ठिकठिकाणी परीक्षा झाली. परिक्षेला ६२ हजार विद्यार्थी बसले होते. वाहनचालका श्रेणी-२ या पदासाठी ९० मिनिटांत १०० गुणांचे १०० प्रश्न सोडवणे अपेक्षित होत. अशा प्रश्नांचा आपल्यावर होत असलेला मारा बघून काही परिक्षार्थी परिक्षाच सोडून पळून गेले.