नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आणि गुजरात राज्यातील डांग जंगलात मुसळधार पाऊस झाल्याने रंगवली नदीला पूर आला. नवापूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील देवमोगरा रेल्वे फाटका जवळ पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र - गुजरात राज्यातील सीमा भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले होते. करंजी ओवरा या महादेव मंदिरातही पाणी शिरले आहे. पुरामुळे रस्त्यांवर पाणी आल्याने नवापूर भागातील अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होती.
मुख्य महामार्गांवर तर तब्बल पाच ते सात किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. काही मार्गांवर वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. या नदीवर अनेक ठिकाणी पूल कमकुवत असल्याने वाहतूक धीमी करण्यात आली होती.