जळगाव : गंमत म्हणून तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे ३० कोटी रुपये लाच मागितली होती, असा हास्यास्पद जबाब अटक आरोपी गजानन पाटील याने एसीबीला दिलाय.
याच जबाबाच्या आधारे एसीबीने गजानन पाटील याची सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण, न्यायालसाने एसीबीची ही मागणी फेटाळत गजानन पाटील याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.
३० कोटींची लाच मागणारा रमेश जाधव हा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित पीए आहे. एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच स्वीकारताना गजानन पाटील याला अटक करण्यात आली. आपण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं पाटीलनं सांगितलं होतं. मात्र आपल्या कार्यालयात अधिकृत अथवा खासगी स्वरुपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचा खुलासा खडसे यांनी केलाय.
ठाणे येथील एका संस्थेला कल्याणमधील जागा मिळवून देण्यासाठी पाटीलनं लाच मागितली होती. यातला १५ कोटींचा पहिला हप्ता घेण्यासाठी पाटील आला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहाथ अटक केली. पाटील हा मुळाच मु्क्ताईनगरचा राहणारा आहे.