जात पंचायतीचं भूत : २२ कुटुंबांवर बहिष्कार

सांगलीत २२ कुटुंबावर धनगर समाजाच्या जात पंचायतीनं सामाजिक बहिष्कार घातल्यामुळे पुन्हा एकदा बहिष्काराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

Updated: Jun 16, 2015, 09:34 PM IST
जात पंचायतीचं भूत : २२ कुटुंबांवर बहिष्कार title=

रवींद्र कांबळे, सांगली : सांगलीत २२ कुटुंबावर धनगर समाजाच्या जात पंचायतीनं सामाजिक बहिष्कार घातल्यामुळे पुन्हा एकदा बहिष्काराचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

सांगली जिल्ह्यातल्या येळावी गावातल्या धनगर समाजाच्या जात पंचायतीनं शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख शोभा गावडे यांच्या कुटुंबासह २२ कुटुंबांवर बहिष्कार टाकलाय. गेल्या १० वर्षांपासून त्यांना जात पंचायतीच्या अन्यायकारक कृत्याचा त्रास सहन करावा लागतोय.

धार्मिक विधीच्या मानापमानातून बहिष्कार
येळावी गावातल्या बिरोबा मंदिरात धनगर समाजाच्या धार्मिक विधीच्या मानापमान देण्याच्या वादातून बहिष्काराचं अस्त्र उपसण्यात आलंय. या २२ कुटुंबांना समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी करुन घेतलं जात नसल्याचा आरोप गावडे कुटुंबानं केलाय. पीडित कुटुंबानं पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केलीय. 

तर शोभा गावडे शिवसेनेशी निगडीत आहेत आणि आम्ही राष्ट्रवादीशी... त्यामुळे राजकीय सूड भावनेनं हा आरोप केला जात असल्याचं धनगर समाजाचे पंच शांताराम गावडे यांनी म्हटलंय.

राज्यातल्या अनेक कुटुंबांना छळणाऱ्या सामाजिक बहिष्काराच्या समस्येला केवळ कायद्यानं उत्तर शोधता येणार नाही. त्यासाठी खरी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.