खान्देशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात साजरा

सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात त्याच प्रमाणे खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात. 

Updated: Aug 9, 2016, 10:29 AM IST
खान्देशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात साजरा title=

जळगाव : सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात त्याच प्रमाणे खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात. 

खान्देशातलं सर्वात प्रसिद्ध ग्रामदैवत असा कानबाई मातेचा लौकिक... निसर्गपूरक असा हा कानबाईचा सण खान्देशात श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. पंधरा दिवस आधीपासूनच उत्सवाच्या तयारीची सुरुवात होते... अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो...त्यावरची अशी आकर्षक रोषणाई सा-यांचंच लक्ष वेधून घेते...कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिलं जातं...त्याला अलंकारानं मढवलं जातं... 107 प्रकारच्या वनस्पती आणि 7 नद्यांचं पाणी आणून कानबाईची पूजा केली जाते.  

रात्री कानबाई मातेची स्थापना करून रात्रभर कुटुंबातील सदस्य अहिराणी भाषेतील लोकगीतांवर नृत्य करतात. 'रोट'चा प्रसाद या उत्सवासाठी खास तयार केला जातो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ग्रहण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी वाद्यांच्या तालावर कानबाईची विसर्जन मिरवणूक काढतात. या मिरवणुकीत आबालवृद्ध वाद्याच्या तालावर ठेका धरत सारी दुःख विसरून जातात.  
 
जात, पात, धर्म बाजूला ठेवून अत्यंत पवित्र असा हा कानबाई उत्सव खान्देशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल सतत सांगत असल्यामुळे पिढ्यानपिढ्या खान्देशात कानबाईच्या पूजेची परंपरा अव्याहत सुरु आहे.