पुणे : पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरलंय. गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला भरलंय, धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आज या धरणातून २०८० क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं. सकाळी ११ च्या दरम्यान धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.
खडकवासल्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचं प्रमाण टप्प्या टप्प्यानं वाढवण्यात येत आहे. नदीत सोडण्यात आलेलं पाणी उजनीला जाऊन मिळणार आहे. पुण्यामध्ये जून महिना कोरडा गेला. मात्र जुलैच्या सुरवातीपासूनच पावसानं जोर धरलाय.
खास करून धरण क्षेत्रात संततधार सुरू आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला या ४ धरणांमधून पुण्याला पाणीपुरवठा होतो. सध्याच्या पावसामुळे या धरणसाखळीतील पाणीसाठा १२ टीएमसी वर म्हणजेच ४० टक्क्यांवर गेलाय.
खडकवासला हे या साखळीतील सर्वात खालचं आणि सर्वात लहान धरण आहे. ते लगेचच भरल्यामुळे पाणी सोडण्याची वेळ आलीय. मात्र पाऊस असाच सुरू राहिला तर इतर धरणं भरायलाही वेळ लागणार नाही. दरम्यान दुपारनंतर खडकवासल्यातील पाण्याचा विसर्ग ४२८० क्युसेक्सवर नेण्यात आलाय.