पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज! पाहा कोकणप्रेमींसाठी काय खास!

पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतांना पाहतो. ते टाळण्यासाठी यंदा कोकण रेल्वेनं काय उपाययोजना केल्यायेत पाहूयात.

Updated: Jun 10, 2015, 10:02 PM IST
पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज! पाहा कोकणप्रेमींसाठी काय खास! title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी: पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतांना पाहतो. ते टाळण्यासाठी यंदा कोकण रेल्वेनं काय उपाययोजना केल्यायेत पाहूयात.

कोकण... निसर्ग सौंदर्याची लयलूट... कोकण म्हणजे सौंदर्याची खाण.. आणि पावसाळ्यात कोकणचं सौंदर्य पाहण्याची मज्जाच काही और... फेसाळणारे धबधबे... हिरवीगार वनराई... सभोवतालचं मन प्रसन्न करणारं वातावरण... चिंब पावसात भिजण्याचा आनंद लुटायचा असेल तर कोकण भूमीतच जायला हवं. मात्र अनेकदा पावसाळ्यात ट्रेननं कोकणात जाणाऱ्यांना मनस्तापच अधिक असतो. कारण पावसाळ्यात न चुकता ठप्प पडणारी कोकण रेल्वे... दरडी कोसळणं... जमीन खचणं अशा घटनांमुळं पावसाळ्यात कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडते. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेनं यंदा विशेष काळजी घेतलीय.

दोन ते तीन वर्षात रत्नागिरी नजीकचा पोमेंडी आणि निवसरचा परिसर कोकण रेल्वेसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरला. मात्र या समस्यांवर मात करण्यात यश आल्याचा दावा कोकण रेल्वे करतेय.

दरड कोसळणाऱ्या जागांवर स्टीलची जाळी बांधण्यात आलीय. बोगद्यांची विशेष काळजी घेतली जाणारेय. अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीही उभारल्यायत. रुळांवर पाणी साचू नये किंवा नाल्याचं पाणी रुळांवर येऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आलीय. कोकण रेल्वेच्या मार्गावर २४ तास मानवी गस्त असणारेय. 
 
२०११-१२ मध्ये पावसाळ्यात पोमेंडीमध्ये कोकण रेल्वे तब्बल ४ वेळा बंद पडली. २०१२-१३ साली पोमेंडीजवळ पुन्हा रेल्वे मार्गात अडथळा आला. २०१३-१४मध्ये पोमेंडी, निवसरजवळचे अडथळे दूर केल्यानं कोकण रेल्वे पावसाळ्यात सुरळीत सुरू होती.

कोकण रेल्वे मार्ग सुरक्षित असल्याचा दावा प्रशासनानं केलाय खरा... मात्र त्यासोबतच निसर्गाची साथही आवश्यक आहे. तरच कोकणप्रेमींचा प्रवास सुखकर होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.