मुंबई : उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या बातमीनंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र 24 तास उलटून गेले तरी संशयित दहशतवाद्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळं सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे.
दरम्यान, उरणच्या घटनेतलं गूढ कायम आहे. संशयित दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. 24 तास उलटले तरी दहशतवादी सापडेनासे झाले आहेत. पोलीस, नौदल, तटरक्षक दल अशा विविध गुप्तचर यंत्रणांची सध्या झोप उडाली आहे. कारण उरणमध्ये घातपाती कारवाया घडवण्यासाठी घुसलेल्या चौघा कथित संशयित दहशतवाद्यांचा अद्याप ठावठिकाणा सापडलेला नाही.
उरण एज्युकेशन सोसायटी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चार बंदुकधारी दहशतवाद्यांची माहिती पोलिसांनी दिली. तेव्हा सुरू झालेलं सर्च ऑपरेशन आता कोकण किनारपट्टीवर वाढवण्यात आले आहे. रायगड आणि सिंधुदुर्गातले किनारेही पोलिसांनी अक्षरशः पिंजून काढलेत.
उरण परिसरात मरीन विभागानं गस्त वाढवलीय. उरण, मोरा परिसरात गस्तीसाठी तीन जादा टीम तैनात करण्यात आल्यात. करंजा, बोरी, पिरवाडी या पॉईंटवर डोळ्यात तेल घालून पहारा दिला जातोय.
उरण परिसरात नागारिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. लागोपाठ दुस-या दिवशी शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलीत.
उरणच्या ज्या भागात संशयित दिसले, तिथून अवघ्या तीन किलोमीटरवर करंजा गाव आहे. अनेक पॅसेंजर बोटी या किना-यावरून अलिबागच्या दिशेने जातात. मात्र मंगळवारच्या अलर्टनंतरही इथं साधी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली नाही.
उरणमधले नागरिक सध्या दहशतीच्या सावटाखाली आहेत. सुरक्षा यंत्रणांनी संशयित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी कंबर कसली आहे. पण जोपर्यंत त्यांचा सुगावा लागत नाही, तोपर्यंत ही भीती कायम असणार आहे.