मुंबई : पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अजित पवारांना उद्देशून शिवीगाळ करणाऱ्या भाषेवरून महाराष्ट्रात एकच गदारोळ उठला. अनेक ठिकाणी जानकर यांच्या पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता महादेव जानकर यांनी आपल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केलीय.
एकच गोंधळ उडाल्यानंतर अज्ञातवासात गेलेल्या महादेव जानकरांनी आता मात्र एका पत्राद्वारे 'आपल्या शब्दांचा विपर्यास केला गेला' असं म्हणत खेद व्यक्त केलाय.
खंडेराया ची शपथ, मी गरीबांचा प्रतिनिधी आहे बलाढ्यांशी लढा देतो पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशात तपासावा. गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचे मूळ कोठे आहे हे जगाला माहित आहे. या आशयाचे मी काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले. आताच भगवान गडावरील भाषणाचे एवढे भांडवल झाले हे विशेष वाटते. सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचे मूळ आहे. यात कोण आहे हे सर्वज्ञात आहे. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुःखावण्यासाठी हे बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुशीत झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो.
- महादेव जानकर
मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय
भगवानगडाच्या पायथ्याशी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरांनी केलेल्या भाषणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं बुधवारी ठिकठिकाणी आंदोलनं, निषेध केला. परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज, वडवणी इथं जानकरांच्या पुतळ्याचं दहन करून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकरांच्या फोटोला जोडे मारले तसंच जानकरांच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली. जानकरांनी माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर जळगावात जानकरांच्या पुतळ्याचं दहन करताना पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला. पुतळा दहन करू न दिल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद रंगला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी जानकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.