मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद

गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय. १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. 

Updated: Sep 9, 2015, 09:38 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद title=

मुंबई : गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलेय. १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. 

या बंदीमुळे सुमारे ४ हजार ५०० मालवाहू ट्रक आणि अवजड वाहने बंद राहणार आहेत. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी काहीप्रमाणात कमी होईल. मात्र, ही बंदी घालण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, गणपती उत्सवाआधी महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील असे भाजप-शिवसेना सरकारने जाहीर केले होते. मात्र, महामार्गावर खड्डेच खड्डे दिसत असून सरकारचे आश्वासन हवेत विरल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या तब्बल ६ हजार जादा एसटी बसेस मुंबई, परळ, भांडूप, घाटकोपर, नालासोपारा, ठाणे, कल्याण येथून कोकणात जाणार आहेत. ही सर्व वाहने गणेशोत्सवापूर्वीच्या पाच ते सहा दिवस आधीपासून कोकणात जाण्यास सुरुवात करतात. मोठय़ा प्रमाणातील ही वाहनसंख्या आणि गोवा महामार्गाची दुरवस्था या पार्श्‍वभूमीवर या महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कोकणाकडे जाणार्‍या अवजड वाहनांना १४ सप्टेंबरपासून बंदी करण्यात आली आहे. 

या बंदीतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन व भाजीपाला इत्यादींची वाहतूक करणार्‍या वाहनांना वगळण्यात आले आहे. 

जड वाहतुकीस बंद करण्यात आलेले मार्ग 
- पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (रा.म.क्र. जुना १७) वरील पनवेल ते सिंधुदुर्गमार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या मार्गावरून होणारी अवजड वाहनांच्या वाहतुकीस १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारापासून १७ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंदी असणार आहे. 

- ५ दिवसांच्या गणपती व गौरी विसर्जनानिमित्त २१ सप्टेंबरला रात्री आठ वाजल्यापासून ते २३ सप्टेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. 

- १८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (राज्य मार्ग क्र . जुना-१७ ) वर सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. 

- नाशिक-ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्र . ३ वर १४ सप्टेंबरला चार वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना तसेच ट्रेलर, वाळू, रेती वाहतुकीचे ट्रक यांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.