जिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत

नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

Updated: Nov 8, 2016, 07:05 PM IST
जिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत title=

परभणी : नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.

जिंतूर नगरपालिका म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. गेल्या साडे बावीस वर्षांपासून जिंतूर नगरपालिका काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डिकर यांच्याकडेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोर्डीकरांच्या बुरुजाला हादरे देण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र त्यांना ते शक्य झालं नव्हतं. मात्र विधानसभा निवडणुकीत बोर्डीकरांच्या पारंपरिक गडाला विजय भांबळेंनी सुरुंग लावला.

भांबळे बोर्डिकरांचे कट्टर शत्रूच. या दोघांचा कायमस्वरुपी संघर्ष सगळ्याच निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला.. बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत अभद्र युती करुन बोर्डिकरांनी विधानसभेतल्या पराभवाचा वचपा काढला. आता नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा बोर्डिकर विरुद्ध भांबळे संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

जिंतूर नगरपालिकेत आधी 21 नगरसेवक होते. 2006 साली राष्ट्रवादी काँग्रेसने दहा आणि काँग्रेसने दहा जागा जिंकल्या होत्या. तर एक जागा अपक्ष प्रताप देशमुखांकडे गेली होती. 2011 साली काँग्रेसचे 12 नगरसेवक तर काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले. तर एक जागा अपक्ष गजानन रोकडे यांच्याकडे गेली. आता नवीन प्रभाग रचनेनुसार एकूण 23 नगरसेवक असणार आहेत. 

आता मार्केट कमिटी आणि जुना वचपा काढत काँग्रेसला धोबी पछाड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. विजय भांबळे यांच्या अरेरावीला कंटाळून नगरसेवक प्रताप देशमुख यांनी या निवडणुकीत वेगळी चूल मांडली. तिसरी शहर विकास आघाडी स्थापन करुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवडणूक चिन्हाखाली त्यांचे 18 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

जिंतूरची जनता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कंटाळली आहे. त्यामुळं केंद्र आणि राज्याप्रमाणे जिंतूरची जनताही आमच्याच पारड्यात मत टाकतील असा विश्वास भाजपला आहे. जिंतूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेत. 
 
यांत काँग्रेसकडून शुभांगी गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सबीयबेगम फारुकी आणि तिस-या आघाडीकडून अहिल्याबाई विनायक देशमुख रिंगणात आहेत. नेते राजकारणात मश्गुल असले तरी सर्वसामान्य जिंतूरकर मात्र या सगळ्यामुळे नाखुश आहे. त्यांना आता विकासाचं राजकारण हवे आहे. जिंतूरमध्ये 56 टक्के मतदार मुस्लिम आहे. त्यामुळं मुस्लिम मतदार आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका पार पडणार आहेत. गेल्या 25 वर्षांपासून जिंतूरमध्ये काँग्रेसची सत्ता असूनही मूलभूत प्रश्न अजूनही जैसे थे आहेत. त्यामुळे राजकारण न करता या पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता असे प्रश्न सोडवणा-या पक्षाची सत्ता यावी, अशी आशा जिंतूरकरांना आहे.