धुळ्यात कॉपी बहाद्दर 'मुन्नाभाई'ला रंगेहाथ अटक

धुळे जिल्ह्यात तलाठी भर्ती प्रक्रियेत ब्लूटूथच्या आधारे कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Updated: Sep 11, 2016, 08:17 PM IST
धुळ्यात कॉपी बहाद्दर 'मुन्नाभाई'ला रंगेहाथ अटक  title=

धुळे : धुळे जिल्ह्यात तलाठी भर्ती प्रक्रियेत ब्लूटूथच्या आधारे कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

धुळे शहरातील एसएसव्हीपीएस इंजिनीअरिंग महाविद्यालयात तलाठीच्या परीक्षेत ब्लूटूथच्या आधारे कॉपी करताना मदन कापूरचंद गुसिंगे या परीक्षार्थिला रंगेहात पकडण्यात आलं.

गुसिंगे हा ब्लूटूथ डिवाईसच्या आधारे परीक्षा केंद्रात पेपर सोडवत होता. जालना जिल्ह्यातील काही परीक्षार्थी हे डमी असून काही विद्यार्थी हे ब्लूटूथ डिवाईसचा वापर करून पेपर देणार असल्याची गोपनीय माहितीचे पत्र जिल्हा प्रशासनाला मिळाले होते. त्यानुसार प्रशासनाने सर्व परीक्षा केंद्रांवर कसून चौकशी सुरु केली.

यावेळी, अधिकाऱ्यांना मदन गुसिंगे याच्या हालचालींचा संशय आला. तपासणी करत असताना तपासणी अधिकारी अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मदन गुसिंगे याच्याकडून ब्लूटूथ डिवाईस जप्त केलं.

यावेळी मदनकडून डिवाईस जप्त करत असताना मदन गुसिंगे याने परिवेक्षकांसह तहसीलदाराशी झटापटी करत धक्काबुकी करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसरत करत मदन गुसिंगे याला अटक केली आहे. 

दरम्यान, मदन गुसिंगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून या कॉपी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होतेय. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

धुळे शहरात आज धुळे जिल्हा तलाठी भर्ती परीक्षा होती. 17 जागांसाठी तब्बल 12 हजार विध्यार्थी या परीक्षेला बसले होते.