नागपूर नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री, गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या या शहरात भाजप वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असतील तर विरोधक त्यांना रोखण्यासाठी झटतील, अशी स्थिती दिसत आहे.

Updated: Oct 18, 2016, 10:52 PM IST
नागपूर नगरपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री, गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला title=

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या या शहरात भाजप वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील असतील तर विरोधक त्यांना रोखण्यासाठी झटतील, अशी स्थिती दिसत आहे.

केंद्रात, राज्यात आणि नागपुरात भाजप सत्ता स्थानी असल्यानं इथल्या निवडणुकांना राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. 9 पैकी 5 नगर परिषदेत भाजपची सत्ता आहे. भाजपनं आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत तर विरोधकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

कामठी नगर परिषदेत बहुजन रिपब्लिकन एकता मंच आणि अपक्षांच्या सहाय्यानं भाजप सत्तेवर आहे. पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्यानं इथली लढत चुरशीची ठरणार आहे. उमरेड नगर परिषदेत काँग्रेस सत्तेत आहे. माजी मंत्री राजेंद्र मुळक हे उमरेडचे असल्यानं त्यांच्यासाठी ही लढत महत्वाची असेल. 

मोहपा नगर परिषदेत काँग्रेस सत्तेवर आहे. खरं तर सुरुवातीला इथं 10 सदस्य निवडून आल्यानं भाजपची इथं सत्ता होती. पण 10 पैकी 8 सदस्यांनी बंड करत काँग्रेसची कास धरल्यानं खांदे-पालट होत काँग्रेस सत्तेत आली. 

खापा नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. आमदार सुनील केदार आपल्या सावनेर मतदार संघातील नगर परिषदेत जरी सत्ता टिकवू शकले नसले तरी खापामध्ये मात्र त्यांचाच गट सत्तेत आहे. 

नरखेड नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे. या दोन पक्षांनी स्थानिक जन क्रांती आघाडीसह सत्ता स्थापन केलीय. 

काटोल नगर परिषदेत सध्या भाजप-प्रणित काटोल विकास आघाडीची सत्ता आहे. स्थानिक नेते चरण सिंह ठाकूर यांच्यासह ही युती स्थापन करण्यात आलीय. 

कळमेश्वर नगर परिषदेत भाजप-सेनेची सत्ता आहे. सेनेचा अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष अश्या प्रकारे इथं पदांचं वाटप झालंय. 

रामटेक नगर परिषदेत शिवसेनेची सत्तेत आहे. याठिकाणी कृपाल तुमाने यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 

सावनेर हा काँग्रेस आमदार सुनील केदार यांचा बालेकिल्ला. मात्र इथल्या नगर परिषदेत केदार विरोधी गट आणि भाजपनं नगर विकास आघाडीच्या सहाय्यानं सत्ता स्थापन केलीय. 

नागपुरात केलेल्या विकासकामांमुळे मतदार आपल्यालाच कौल देतील असा विश्वास शिवसेना-भाजपला आहे.