अखिलेश हळवे, नागपूर : चांगल्या पगाराची नोकरी कुणाला नको असते... पण गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आव्हानात्मक कामं करायला आवडतात. नागपूरची निधी दुबे ही त्यापैकीच एक... आयटीमधली भरभक्कम पगाराची नोकरी सोडून निधी भारतीय वायूसेनेत ती दाखल झालीय.
नागपूरच्या मैदानात सराव करणारी विशीतली तरूणी... निधी दुबे... काल-परवापर्यंत आयटी क्षेत्रात ती चांगल्या पगाराची नोकरी करत होती. पण आता तिनं भारतीय वायूसेनेसाठी काम करायचं ठरवलंय. त्याचं झालं असं की, तिची मोठी बहिण कॅप्टन नुपूर दुबे हीदेखील लष्करी सेवेत आहे... बहिणीची पासिंग आऊट परेड बघायला निधी गेली आणि निधीला प्रेरणा मिळाली. तिनंही वायूसेनेत भरती होण्याचा निर्णय घेतला.
सर्वसामान्य कुटुंबातील पालक आपल्या मुलांना लष्करात पाठवत नाहीत. पण नागपूरच्या दुबे परिवारानं आपल्या दोन्ही मुलींना लष्करी सेवेसाठी प्रेरित केलं. आपल्या मुलींच्या निर्णयाचा डॉ. प्रद्युम्न दुबे आणि आशा दुबे यांना सार्थ अभिमान वाटतोय.
आयटीसारख्या क्षेत्रातली नोकरी सोडून भारतीय वायू सेनेत भरती होण्याचा निर्णय क्वचितच कुणी घेईल. थोरली मुलगी लष्कराच्या सेवेत असताना, धाकट्या मुलीलाही तीच वाट जोपासण्याची परवानगी देणाऱ्या दुबे कुटुंबाचं कौतूक करावं तितकं कमी...