भेटा, भारतातल्या 84 वर्षीय 'तरण्या' ट्रेकरला!

 हिमालयातली जिवघेणी थंडी,  बदलणार वातावरण आणि खडतर रस्ते अशा ठिकाणी ट्रेकिंग करणं हे भल्याभल्यांना जमत नाही... ते करुन दाखवलयं पुण्यातील गोपाळ लेले यांनी... हिमालयामध्ये तब्बल 10 ट्रेक करणाऱ्या आणि अवघं 84 वर्षे वय असणाऱ्या लेलेंच्या या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'मध्येही घेण्यात आलीय.

Updated: Mar 30, 2016, 10:27 PM IST
भेटा, भारतातल्या 84 वर्षीय 'तरण्या' ट्रेकरला! title=

अश्विनी पवार, पुणे :  हिमालयातली जिवघेणी थंडी,  बदलणार वातावरण आणि खडतर रस्ते अशा ठिकाणी ट्रेकिंग करणं हे भल्याभल्यांना जमत नाही... ते करुन दाखवलयं पुण्यातील गोपाळ लेले यांनी... हिमालयामध्ये तब्बल 10 ट्रेक करणाऱ्या आणि अवघं 84 वर्षे वय असणाऱ्या लेलेंच्या या कामगिरीची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'मध्येही घेण्यात आलीय.

हिमालयामध्ये तब्बल 10 हून अधिक ट्रेक, चिंचवड ते इंदौर बाईक राइड, गुहागर ते कन्याकुमारी पायी प्रवास... गेल्या चाळीस वर्षात हे सगळं काही करणारी व्यक्ती ही नक्कीच कोणीतरी खेळाडू किंवा व्यावसायिक गिर्यारोहक असेल असं तुम्हाला वाटेल... परंतु पुण्यातील 84 वर्षांच्या तरुणाने हे सगळं विक्रम आपल्या निवृत्ति नंतर केले आहेत. 

'ओल्डेस्ट ट्रेकर' म्हणून गौरव

पुण्यातील प्राधिकरणात राहणारे गोपाळ वासुदेव लेले... हिमालयाविषयी भरभरुन बोलतात... ज्या वयामध्ये निवृत्त होऊन आरामात आयुष्याचा आनंद घ्यायचा अशा वयात गोपाळ लेलेंना हिमालयाची शिखर साद घालत असतात. 2014 मध्ये केलेल्या 'रुपीन पास'च्या ट्रेक साठी लेले यांच्या नावाची 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही नोंद झालीय. 'ओल्डेस्ट ट्रेकर' म्हणून त्यांना गौरविण्यात आलयं.

शिक्षण, नोकरी आणि संसार या सगळ्यांमुळे तरुणपणात कधी ट्रेकिंग करता आलं नाही. मात्र हीच हौस पुर्ण करण्याची संधी चाळीशीनंतर मिळाली. ट्रेकनिक या संस्थेबरोबर त्यांनी केवळ हिमालयच नाही तर उत्तर भारतातही अनेक ट्रेक केले. लहानपणापासून सूर्यनमस्कार घालायची सवय आणि समतोल आहार यामुळे आजही आपली ऊर्जा टिकून असल्याचं लेले सांगतात. 

रुपकुंड ट्रेकिंगची तयारी

व्यावसायाने इंजिनिअर असणाऱ्या गोपाळ लेलेंनी निवृत्तीनंतर स्वत:च वर्क शॉप सुरु केलं. बागकामासारखी आवडही ते जोपसतात. मात्र, हे सगळं करत असतानाही ते सप्टेंबर मध्ये होणाऱ्या रुपकुंड या उत्तराखंडमधील ट्रेकिंगसाठी तयारी करत आहेत. वयाच्या 84 व्या वर्षी तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने ट्रेकिंग करणारे गोपाळ लेले हे आज तरुण ट्रेकर्स पुढे एक आदर्श बनले आहेत.