अरूण मेहेत्रे, पुणे : पालावर जन्मलेली एक तरुणी महापालिकेत जायला निघालीय. गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला येणाऱ्या पारधी समाजातील राजश्री काळे ह्या यावर्षी अनुसूचित जमाती गटातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांशी आहे.
राजश्री ज्ञानेश्वर काळे... मूळच्या सोलापूरच्या... जन्म पारधी वस्तीवर... खरं तर पुढे काही सांगण्याची गरजच नाही. राजश्री बालवयात असताना वडिलांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली... आईनं दुसऱ्या नवऱ्यासोबत संसार थाटला... भावाच्या आधारानं मोठी झालेल्या राजश्रीचा संपूर्ण जीवनप्रवास संघर्षमय आहे. 'भटके विमुक्त परिषदे'च्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात आल्या. रात्र शाळेत शिक्षण पूर्ण करत असतानाच त्या आज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रभाग क्रमांक ७ म्हणजेच पुणे विद्यापीठ वाकडेवाडीतून त्या भाजपच्या उमेदवार आहेत.
पुण्यात भटके विमुक्त महिलांसाठी केवळ एक जागा आरक्षित आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या धनश्री चव्हाण, शिवसेनेच्या सुरेखा भवारी आणि काँग्रेसच्या नंदा रोकडे यांचं आव्हान राजश्री यांच्यासमोर आहे.
हल्ली महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्यामुळे निवडणूक लढण्याची बऱ्यापैकी संधी मिळते. मात्र भटके विमुक्त सारख्या प्रवर्गात महिला उमेदवार मिळणं आजही अवघड आहे. अशा परिस्थितीत महापालिका निवडणूक लढवणाऱ्या राजश्री या बहुदा पारधी समाजातील पहिल्या उमेदवार असाव्यात. त्यामुळे त्या निवडून येवो अगर ना येवो, त्यांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणं हे देखील निवडणूक जिंकण्याइतकंच महत्वाचं आहे.