संगमनेर : आई-वडिलांचा विरोध असल्यानं 'सैराट' सिनेमातील हिरो - हिरोईन पळून जाताना तुम्ही पाहिले असतीलच... असेच आर्ची आणि परश्या (बदललेले नाव) संगमनेरमध्येही पाहायला मिळाले.
संगमनेरमधल्या घुलेवाडीमध्ये मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं तिच्या आई-वडिलांना समजलं. यामुळे त्यांनी या तरुणीचा विवाह दुसऱ्याच तरुणाशी लावून दिला. मंडपात सात फेरेही पार पडले... आणि नवरी नवरदेवाला घास भरवत असतानाच तिचा प्रियकर मंडपात दाखल झाला. प्रियकराला पाहून अल्पवयीन नवरीलाही धीर आला... तिनं प्रियकराचा हात धरून मंडपातून 'सैराट' धूम ठोकली.
पण, याही आर्ची आणि परशाला मुलीच्या नातेवाईकांनी पकडलं... आणि मुलीला घरी घेऊन गेले.
परंतु, दुसऱ्याच दिवशी या अल्पवयीन तरुणीनं पोलीस स्टेशन गाठलं... आणि अल्पवयीन असताना आपल्या आई-वडिलांनी बळजबरीनं लग्न लावून दिल्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.