रत्नागिरी : रत्नागिरीत सध्या सैन्यभरती सुरु आहे. मात्र उमेदवारांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासन मात्र एकमेकांकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहे. मुंबईतील पोलीस भरतीच्यावेळी जे उमेदवारांचे हाल झालेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला होता. ही गोष्ट धान्यात घेवून भाजपने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी मोफत खिचडी वाटप केले. तर शिवसेनेने त्यांना अन्यबाबतीत मदत केली.
जिल्हा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार म्हणजे काय असतो, त्याचा अनुभव सध्या सैन्य भरतीसाठी आलेले उमेदवार घेत आहेत. ना प्यायला पाणी. ना शौचालयाची व्यवस्था. ना झोपण्यासाठी आसरा. रत्नागिरीतल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सध्या गेल्या दोन दिवसांपासून सैन्यभरतीची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूरमधून अनेक उमेदवार आलेत.
यासंदर्भात सैनिक कल्याण विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी सैन्यभरती नियोजनासंदर्भात स्थानिक जिल्हा प्रशासनाशी सहा महिन्यांपूर्वी बोलणं झाल्याचं उत्तर दिलं. भावी सैनिकांची आबाळ पाहून स्थानिक नागरिकांनी स्वत:हून मदतीचा हात पुढे केला. तर शिवसेनेनं उमेदवारांच्या कागदपत्रांवर सह्या करत त्यांना सत्यप्रत उपलब्ध करुन दिली. तसंच भाजपकडून उमेदवारांच्या जेवणाची सोय करण्यात आली.
१८ फेब्रुवारीपर्यंत ही सैन्यभरती प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनानं उमेदवारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं हीच अपेक्षा आहे. अन्यथा मुंबईत पोलीस भरतीच्यावेळी जे झाले त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.