आशिष अम्बाडे, गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी रस्ता बांधायला कोणी ठेकेदार पुढे येत नव्हता... अशा वेळी त्रस्त ग्रामस्थांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही सर्वोतपरी मदत करत श्रमदानातून रस्ता बांधला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील घटनेनं परस्पर संवादाचं एक नवं पर्व सुरु झालंय.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका म्हणजे मागासपणाचे टोक... या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून मन्नेराजाराम-भामनपल्ली रस्ता आणि पुलाच्या दुरूस्तीबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी कोणीही कंत्राटदार पुढे येत नाही, असे कारण देत सरकारने रस्त्याची दुरूस्ती केलेली नाही.
त्यामुळे मन्नेराजाराम, भामनपल्ली परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बससेवाही बंद झाली आहे. मागील दोन वर्षांपासून नागरिकांना खासगी प्रवाशी वाहनांचा आधार प्रवासासाठी घ्यावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट पोलिसांकडे मदत मागितली. सर्वप्रथम हे काम ग्रामस्थांच्या श्रमदानातून पूर्णत्वास नेण्याचा निर्णय झाला. गावागावातील ग्रामस्थांची सभा बोलावून श्रमदानातून रस्ता दुरूस्ती करून बससेवा सुरू करण्याबाबत पोलीस विभागाने पावले उचलली.
भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात छोट्या समस्या मोठ्या असंतोषाचे कारण ठरतात हे लक्षात घेत स्थानिक अधिकाऱ्यांनी एका कृतीने स्थानिकांची मनं जिंकली... परिसरात परस्पर संवादाचे पर्व सुरु झालंय, असं ताडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील म्हणतात.
परंतु, भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती मागील पाच ते दहा वर्षांपासून झालेली नाही. भामरागड-लाहेरीसारख्या सतत चर्चेत असणाऱ्या मार्गाच्या दुरुस्तीकडेही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. प्रत्येक जागी श्रमदान अपेक्षित आहे का? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.