रत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10  कोटीहून अधिक रक्कम असलेल्या चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणात आता संशयाचं धुकं दाटू लागले आहे.  

Updated: Jan 11, 2017, 12:09 AM IST
रत्नागिरीतील रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10  कोटीहून अधिक रक्कम असलेल्या चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणात आता संशयाचं धुकं दाटू लागले आहे. इतक्या मोठ्या रक्कमेचा रक्तचंदन सापडूनही 11 दिवसांनंतरही एकाही व्यक्तीला ताब्यात घेण्यात वनविभागाल यश आलेले नाही. 

 रक्तचंदन परराज्यातून थेट महाराष्ट्रात आणल्या गेलेल्या आणि चिपळूणातून थेट विदेशात पाठवण्याची तजवीज सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय रॅकेट प्रकरणात कोणाला तरी वाचवण्याचा प्रकार सुरू आहे का, असा संशय आता व्यक्त होवू लागला आहे. यामुळे रक्तचंदन भोवतीचं राजकारण चांगलचं तापले आहे. चिपळूणच्या रक्तचंदन तस्करी प्रकरणात संशयाचं धुकं गडद झाले आहे.

30 डिसेंबर 2016 ला वनविभागाच्या दापोलीतल्या अधिकाऱ्याला चिपळूणमध्ये रक्तचंदन असल्याचा सुगावा लागला आणि त्यानंतर झालेल्या कारवाईत रक्तचंदनाचे 90 ओंडके जप्त केले. तर पुढच्या काही दिवसात जप्त केलेल्या रक्तचंदनाची संख्या चारशेच्या पलीकडे गेली. या रक्तचंदनाची स्थानिक बाजारातील किंमत 2 कोटी तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10 कोटींहून अधिक किंमत आहे. 

चिपळूण येथे सापडलेल्या रक्तचंदनावर पहिली कारवाई केली ती सुरेश वरक या दापोलीच्या अधिका-याने. दोन कारवाईनंतर वरक यांना या तपासापासून दूर करण्यात आलं आणि त्यांची जागा  नव्याने पदावर प्रथमच नियुक्ती होत असलेल्या व्यक्तीला तपासकामाची जबाबदारी देण्यात आली.

या सगळ्या प्रकऱणातील धक्कादायक खुलासा तेव्हा झाला जेंव्हा चिपळूणच्या गोवळकोट परिसरातच हे रक्तचंदनाचे लाकडी ओंडके सोफ्यांमध्ये दडवून बाहेर पाठवण्याची तयारी उघड झाली होती. याचा स्पष्ट अर्थ असा होता चिपळुणात आणलेले 500 हून रक्तचंदनाचे अधिकचे ओंडके सोफ्यांमध्ये दडवून देशाबाहेर पाठवण्याची तयारी झाली होती. विशिष्टपद्धतीने या रक्तचंदनाचे ओंडके सोफ्यांमध्ये अडकवले गेले होते, हे तयारीवरून दिसून येत आहे.

महाराष्ट्रामध्ये रक्तचंदनाचे कुठेही झाडे आढळत नाही. दक्षीण भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी रक्तचंदनाचे मोठे साठे आढळतात. त्यामुळे चिपळुणात पोहोचलेलं हे रक्तचंदन केवळ राज्याचीच सीमा नाही तर राज्याच्या महामार्गांवरील पन्नासहून अधिक तपासणी नाके पार करून चिपळूणपर्यंत पोहोचले कसे हाच मोठा सवाल आहे. वन विभाग आणि एखाद्या मोठ्या राजकीय आशिर्वादाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात हा साठा चिपळूणपर्यंत पोहचू शकत नाही यामुळे स्थानिक पातळीवरील काम करणा-या व्यक्ती ही केवळ छोट्या प्यादी असतील करोडो रूपयांच्या या उलाढाली मागे एखादी मोठी व्यक्ती गुंतली असल्याचा संशय हा साठा सापड्ल्या दिवसापासूनच सुरू झाली होती.

रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे आणि त्यामुळेच चिपळूणमार्गे हे रक्तचंदन परदेशात पाठवण्याची तयारी करण्यात येत होती. कर्नाटकपासिंगच्या रक्तचंदनाच्या गाड्या या चिपळूणच्या गोवळकोट परिसरात मोठ्या प्रमाणात येत होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टोळीच या सगळ्या प्रकारात सहभागी असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. 

पहिल्या कारवाईला आता 11 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करीसाठी काम करणा-या रॅकेटसाठी पुरावे नष्ट करण्यासाठी 11 दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. यामुळे चिपळुणातील रक्तचंदनाच्या दहा कोटीरूपयांच्या या साठ्याच्या भोवतीचे संशयाचे धुके आता अधिक गडद होवू लागले आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x