www.24taas.com, मुंबई
आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ असताना नागपूर आणि नवी मुंबई येथे दोन दिवस धुळवड खेळताना आसाराम बापूंनी लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी केली होती. याविरोधात अनेक सामाजिक संस्थांनी आवाज उठवला होता. विधीमंडळातही हा प्रश्न मांडला गेला होता. अखेर यापुढे आसाराम बापूंच्या होळीसंदर्भातील कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने हा निर्णय विचार न करता घेतलेला दिसत आहे. कारण, आसाराम बापूंच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आसाराम बापूंचे महाराष्ट्रातले कार्यक्रम संपलेले आहेत. आसाराम बापू महाराष्ट्राबाहेर धुळवड साजरी करण्यास निघून गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या या दणक्यामुळे आसाराम बापूंना कुठलाच फरक पडण्याची शक्यता नाही.
आसाराम बापूंनी नागपूरमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी करत धुळवड साजरी केली होती. त्यानंतरच राज्य सरकारने हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र राज्य सरकारने यावर कुठलीच कारवाई केली नाही. दुसऱ्या दिवशी नवी मुंबईमध्येही लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी करत आसाराम बापूंनी धुळवड साजरी केली. यावेळी रिपाइं कार्यकर्ते आणि बापूंचे भक्त यांच्यात बाचाबाचीही झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेण्यात सरकारने वेळ घालवल्यामुळे याचा कुठलाच परिणाम आसाराम बापूंवर झालेला नाही.