ठाणे : आसनगावला रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळल्यानं टिटवाळा ते कसारापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.
तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडलीय. त्यामुळं पाच तासांपासून ट्रॅकवरून हे झाड हटवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात मधमाशांचा अड़थळा येत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. यामुळं आसनगाव आणि कसारा जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. त्यानंतर हे काम सुरू असताना एक पोल ट्रॅकवर पडवल्याने कामात आणखी अडथळा आला.
प्रवाशांना आपल्या स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी ट्रॅकवरून पायपीट करावी लागली. दरम्यान रेल्वे मार्गाला अडथळा ठरणारी झाडं कापण्याचे आदेश रेल्वेतर्फे देण्यात आलेत. रात्री रेल्वेतर्फे राज्यराणी आणि पंचवटी एक्स्प्रेस या मार्गावरून चालवण्यात आली. लांब पल्ल्याच्या या गाड्यांमधून टिटवाळ्यापुढच्या प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली.