आता उदय साळुंखेंची नियुक्तीही वादात!

 कुटुंबीयांच्या नावानं संस्थांचे इमल्यांवर इमले बांधणारे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे आणखी अडचणीत आलेत. त्यांची नियुक्तीच मुंबई विद्यापीठाच्या निकषांमध्ये बसणारी नाही, असा अहवाल चक्क एआयसीटीईच्या चौकशी समितीनं दिलाय.

Updated: Jul 11, 2015, 04:17 PM IST
आता उदय साळुंखेंची नियुक्तीही वादात! title=

मुंबई : कुटुंबीयांच्या नावानं संस्थांचे इमल्यांवर इमले बांधणारे वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. उदय साळुंखे आणखी अडचणीत आलेत. त्यांची नियुक्तीच मुंबई विद्यापीठाच्या निकषांमध्ये बसणारी नाही, असा अहवाल चक्क एआयसीटीईच्या चौकशी समितीनं दिलाय.

डॉ. उदय साळुंखे म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा... मात्र संचालकपदी त्यांच्या नियुक्तीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय... ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर यांनी शिप्र मंडळीच्या गैरकारभाराबाबत विविध पातळ्यांवर तक्रारी केल्या. अगदी कोर्टात याचिकाही दाखल केल्यात.
 
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब जांभुळकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजे एआयसीटीईनं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारंगळचे संचालक डॉ. वाय. व्ही. राव हे या समितीचे अध्यक्ष होते. 

या समितीनं दिलेल्या अहवालातच उदय साळुंखे यांची नियुक्ती मुंबई विद्यापीठाच्या निकषानुसार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. एआयसीटीईचे पश्चिम विभागीय क्षेत्रीय अधिकारी डॉ. पी. के. साहू यांनीही एआयसीटीईचे केंद्रीय दक्षता अधिकारी डॉ. एस. जी. भिरूड यांना २५ फेब्रुवारी २०१० रोजी गोपनीय अहवाल पाठवला होता. मात्र त्यावरही अजून कारवाई झालेली नाही. 

आता शिप्र मंडळीतल्या गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनीच दिले आहेत. ती चौकशी कधी सुरू होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.