नाशिक : नाशिक विभागात पाण्याची स्थिती गंभीर आहे. मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ 19 टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच काळात 17 हजार 870 दशलक्ष घनफूट साठा होता.
पाणीटंचाईचे चटके नाशिक जिल्ह्यात बसायला सुरूवात झालीय. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. धुळ्यात तीन दिवसाआड, जळगावात दोन दिवसांआड पाणी मिळतंय. नाशिक जिल्ह्यात मालेगाव, शिर्डीमध्ये तीन दिवसांआड, येवल्यात दहा दिवसांआड, लासलगावात सात दिवसांआड पाणीपुरवठा होतोय. मनमाड शहरात तब्बल 20 दिवसांनी पाणी मिळतंय.
गंगापूर धरणात 26 टक्के साठा शिल्लक आहे. गौतमी गोदावरीत केवळ एक टक्का पाणी आहे. नांदूरमधमेश्वर बंधारा, नागासाक्या धरण कोरडी झाली आहेत. घटत चाललेल्या पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात 85 गावं आणि 144 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. टंचाईमुळे नाशिक महापालिकेने एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवलाय.