मुंबई : पुणे महापालिका तसेच शहरातील भाजप वगळता इतर सर्व पक्षांचा विरोध डावलून आज खडकवासला धरणातून दौंड इंदापूरसाठी पाणी सोडण्यात आलंय. दुपारी एकच्या सुमारास पाणी कालव्यात एक टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दौंड आणि इंदापूरला हे पाणी पोहचण्यासाठी ५ ते ६ दिवस लागणार आहेत. खडकवासला धरणातून दौंड इंदापूरसाठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांच्या आदेशावरुन जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंदापूर-दौंडसाठी आवश्यक तेवढेच पाणी टँकर किंवा रेल्वेने देण्याची तयारी मनपाने दर्शविली आहे. हा निर्णय घेताना पुणे मनपा तसेच पुण्याच्या नागरीकांना विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वरुनच काल मनसेने सिंचन भवनात तोडफोड केली होती.