पिंपरी-चिंचवड - साडंपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चाललाय. यावर कायमस्वरुपी पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरुय. पण पिंपरीतल्या एका मुलानं स्वस्त आणि मस्त पर्याय शोधलाय. सांडपाण्याच्या पुनर्वापराने पाणीटंचाईवर थोड्याफार प्रमाणात मात करता येते हे ओळखून डी.वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पर्यावरण अभियांत्रिकीच्या समर कामतेकरनं प्रोजेक्ट तयार केलाय.
कन्स्ट्रक्टेड वेटलँड तंत्राचा वापर करून विजेशिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट त्यानं बनवलाय. रेती आणि गवताचा वापर करून सांडपाणी शुद्ध करता येतं. हे पाणी पिण्यासाठी शुद्ध नसलं तरी इतर कामांसाठी त्याचा वापर करता येतो. विज, देखभाल दुरुस्ती आणि जास्त जागेची यासाठी गरज नाही. शहरात अनेक जुन्या इमारतींमध्ये सांडपाणी आणि शौचालयाच्या वेगवेगळ्या पाईपलाईन असतात. अशा इमारतींमध्ये ही पद्धत वापरून पाणी शुद्ध करता येऊ शकतं.
राज्यात भविष्य़ात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर नक्कीच गरजेचा आहे. त्यामुळं समरचा हा साधा आणि सोपा प्रकल्प नक्कीच फायदेशीर आहे.