मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या या घारींना जीवदान

तिचं इवलसं पिल्लू, मांज्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांची सुरु असलेली फडफड, कुठल्याही माणसाचं काळीज हेलावून टाकणारी ही दृष्यं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 16, 2017, 08:20 AM IST
मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या या घारींना जीवदान  title=

पुणे : पतंगाच्या मांज्यात अडकलेली घार आणि तिचं इवलसं पिल्लू, मांज्यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांची सुरु असलेली फडफड, कुठल्याही माणसाचं काळीज हेलावून टाकणारी ही दृष्यं.

पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणात एका इमारतीपाशी २ घारींचा सुमारे तीन तास सुरु असलेला हा संघर्ष आमचे व्हिडीओ जर्नालिस्ट नितीन सांडभोर यांना अस्वस्थ करणारा ठरला. त्यांनी तात्काळ पक्षीमित्रांना बोलावून घेतलं आणि त्या घारींची सुटका केली. पंखांभोवतीचा मांजा काढला तरी घार तिच्या पिल्लाला मोकळं सोडायला तयार नव्हती. 

मातेचं काळीज म्हणतात ते हेच. अथक प्रयत्नांनंतर दोन घारींना एकमेंकींपासून मोकळं करण्यात आलं. आमचे व्हिडीओ जर्नालिस्ट नितीन सांडभोर आणि पक्षीमित्रांच्या संवेदनशीलतेमुळं मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या या घारींना जीवदान मिळालं. 

मात्र या सगळ्यात दोन्ही घारींना बऱ्यापैकी इजा झालीय. त्यामुळे पतंगाचा मांजा पक्षांसाठी कसा जीवघेणा ठरतो हे पुन्हा एकदा समोर आलं. दरम्यान या जखमी घारींना उपचार करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे.