हा तर चार आण्याचा कार्यकर्ता - संजय राऊत

खासदार आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीत जायचं असेल तर खुशाल जावं, पण आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे परांजपेंवर कारवाई करतील, तसचं दहा पैशाचं सदस्यत्व नसताना, आणि वडील प्रकाश पंराजपे यांच्या पुण्याईच्या जोरावर मिळालेली खासदारकी आहे.

Updated: Jan 20, 2012, 11:31 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

खासदार आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीत जायचं असेल तर खुशाल जावं, पण आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे परांजपेंवर कारवाई करतील, तसचं दहा पैशाचं सदस्यत्व नसताना, आणि वडील प्रकाश पंराजपे यांच्या पुण्याईच्या जोरावर मिळालेली खासदारकी  आहे. त्यामुळे असं वागणं त्यांना सोयीस्कर होतं अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेत असूनही खासदार परांजपे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने शिवसैनिक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले.

 

कल्याण - डोंबिवलीत शिवसैनिकांनी आनंद परांपजे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. तर राडा देखील करण्यात आला, त्यामुळे डोंबिवलीमध्ये जवळजवळ ५० शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार आनंद परांजपे यांचा पुतळा जाळला. आचोळे परिसरातल्या शिवसेना शाखेसमोर १०० ते १५० कार्यकर्ते जमले होते.

 

ठाण्यात शिवसेनेनं सुरु केलेल्या फोडाफोडीला शरद पवारांनी दे धक्का दिला. कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे हे आज पवारांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या उपस्थित झाले. अत्यंत फिल्मी स्टाईलनं परांजपे यांच्या झालेल्या आगमनानं सगळ्यांना मोठा धक्का बसला. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. पूर्वीची शिवसेना राहिलेली नाही, असं सांगत यावेळी आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. तसचं ठाण्याच्या शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्त्वावर त्यांनी जोरदार टीका केली. तसचं शिवसेनेत आता विकासावर चर्चा होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तर नागरी समस्यांसाठी चर्चा करण्यासाठी परांजपेंनी भेट घेतल्याचं पवारांनी सांगितलं आहे. एकूणच आनंद परांजपे यांच्या पत्रकार परिषदेतल्या नाट्यमयरित्या आगमनामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.