www.24taas.com, मुंबई
राज्यात जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकीची निकला झाला तरी फटाके फोडून उमेदवाराला तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना साजरा करता येणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विजयाचा आनंदावर आता विरजण पजले आहे.
राज्यातील १० महानगरपालिका, २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांचे निकाल शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे समर्थक फटाके फोडून आनंद साजरा करतात. मात्र याला लगाम बसला आहे. ध्वनी प्रदूषण आणि हवेचे प्रदूषण यांचे कारण पुढे करत यंदा पहिल्यांदाच १७ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत तीव्र आवाजाचे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यासह मुंबईत सर्वत्र ही बंदी लागू असणार आहे.
येत्या २० फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र, सात मार्च रोजी होळी आणि १० मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवाजी महाराज जयंती आहे. या तीन दिवशी राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमांच्या निमित्ताने फटाके फोडले जातात. मात्र यंदा तीव्र आवाजाचे फटाके फोडण्यास बंदी असल्यामुळे पोलीस सर्वत्र करडी नजर ठेवतील. बंदी काळात तीव्र आवाजाचे फटाके फोडणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
देशात रात्री दहा ते सहा यावेळेत कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास, ध्वनीक्षेपकांचा वापर करण्यास (लाऊडस्पीकर) आणि वाद्ये वाजवण्यास बंदी आहे. मात्र पोलिसांच्या आदेशामुळे मुंबईत पहिल्यांदाच महिनाभर तीव्र आवाजाच्या फटाक्यांना बंदी लागू राहणार आहे.