www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेत एमआरआय मशीन खरेदीत घोटाळयाची बातमी ‘झी 24 तास’वर दाखवल्यावर महापालिकेनं त्याची दखल घेतली आहे. महापालिकेनं 80 कोटीच्या नवीन वैद्यकीय साहित्याची MRP
किंमत तपासूनच व्यवहार करावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केलीय. पालिका आयुक्तांनी बातमीची दखल घेतल्यानं गरीब रूग्णांना न्याय मिळणार असल्याचं समाजवादी पार्टीचे नगरसेवक रईस शेख यांनी म्हटलंय.
मुंबई महापालिकेनं गोवंडी आणि कांदिवली शताब्दी रूग्णालयांसाठी दोन एमआरआय मशीन्स 16 कोटी 46 लाख 424 रुपये खरेदी केल्या होत्या. फिलिप्स इंडिया कंपनीकडून एक एमआरआय मशीन 8 कोटी 86 लाख 32 हजार 320 रुपयांना घेतल्याचं टेंडरमध्ये दाखवलं. मात्र, हेच मशीन प्रत्यक्षात 4 कोटी 75 लाखांत मिळत असल्याचं समाजवादी पार्टीचे नगरसेवक रईस शेख यांनी उघडकीस आणलं. एमआरपी किंमती पेक्षा जादा दरानं मशिन्स विकत घेतल्यामुळे स्थायी समिती वादाच्या भोवऱ्यात सापडली. त्यामुळेच एमआरआय मशीन खरेदी घोटाळयाची चौकशी करावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली.
‘झी 24 तास’च्या बातमीची पालिका आयुक्तांनी दखल घेतली. त्यामुळं गरीब रूग्णांना न्याय मिळणार असल्याचं नगरसेवक आणि समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी म्हटलंय. एमआरआय मशीन खरेदीमुळे वैद्यकीय साहित्याची खरेदी 2007 पासून MRP किंमतपेक्षा जादा दरानं करत असल्याचं उघड झालंय. महापालिका या खरेदीची चौकशी करणार का प्रश्न मात्र कायम आहे.
.