www.24taas.com, मुंबई
जूनपाठोपाठ जुलैमध्येही पावसाने तलावक्षेत्रात जोर न धरल्याने पालिका प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. पावसाचे काही खरे नाही हे गृहीत धरून पालिकेने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुरू केली आहे. स्वत: पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी करावयाच्या तयारीची प्रशासनाकडून माहिती मागविली आहे.
सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तलावात २१११५७ दशलक्ष लिटर एवढा साठा आहे. हा केवळ ७५ दिवसांचाच साठा असल्याने पुढे काय? असा प्रश्न पालिकेला पडला आहे. तलावातील पाण्याचा साठा २००९एवढाच आहे. २००९मध्ये तलावामध्ये २००४९० दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे २००९मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. त्याच धर्तीवर यंदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे पालिकेत घटत आहे.
हवामान खात्याचा अंदाज घेणार
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी हवामान खात्याचे पावसासंबंधीचे अंदाज जाणून घेण्यात येणार आहेत. हवामान खात्याने माहिती दिल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार पाडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.
२००९मध्ये काय झाले?
२० ऑगस्ट २००९मध्ये तानसा आणि मोडकसागर धरण क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला होता. पावसाळी ढग दृष्टिक्षेपात येताच विमानातून अवकाशात सोडियम क्लोराईडचा मारा करून पाऊस जमिनीवर आणण्यात आला होता. दोन तास हा प्रयोग चालला होता. त्यामुळे ५ ते १० मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते.
तलाव क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी काय तयारी करायची याची माहिती घेत असल्याचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मान्य केले आहे. २००९मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला होता का? हा प्रयोग केल्यानंतर किती पाऊस पडला? धरणाचा साठा किती वाढला होता? त्याचा काही उपयोग झाला होता का? याची माहिती घेण्यात येत असल्याचे कुंटे यांनी सांगितले.