www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेनं मुंबईकराना फायर टॅक्स लावण्याचा निर्णय घेतलाय. हा फायर टॅक्स प्रति चौरस मीटरप्रमाणे आकारला जाणार आहे. एकीकडे महागाईचे चटके यात पालिकेच्या वाढीव पाणीपट्टी आणि प्रॉपर्टी टॅक्सनंतर फायर टॅक्सनं मुंबईकरांचं आर्थिक ताळेबंद कोलमडणार आहे. या फायर टॅक्सला पालिकेतील विरोधी पक्षांनी विरोध केलाय.
महाराष्ट्र आग प्रतिबंधक अधिनियम 2006च्या कायद्याचा आधार घेत मुंबई महापालिकेनं आग सुरक्षा निधी स्थापन करण्यासाठी फायर टॅक्स लावण्याचा निर्णय घेतलायं. हा फायर टॅक्स प्रती चौरस मीटरप्रमाणे आकारला जाणार आहे. हा फायर टॅक्स पुढील प्रमाणे असणार आहे.
निवासी इमारती करता 15 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या भागात 15 रूपये प्रती चौरस मीटरप्रमाणे दर आकारला जाईल त्यामुळे त्या इमारतीतल्या रहिवाशांना वर्षाकाठी किमान 90 हजार रूपये टॅक्स द्यावा लागेल. उंचीनुसार हा दर वाढत जाईल. हॉटेल्सनादेखील श्रेणीनुसार टॅक्स द्यावा लागेल. सर्वसामान्य हॉटेल्ससाठी 15 रूपये प्रति चौरस मीटर, थ्री स्टार हॉटेलकरता 45 रूपये तर फाईव्ह स्टार हॉटेलकरता हा दर 60 रूपये असेल. शैक्षणीक इमारत, रूग्णालयं, व्यावसायिक इमारतींना प्रति चौरस फुटासाठी 30 रूपये मोजावे लागतील तर व्यापारी संकुलासाठी हा दर 45 रूपये असेल.
हा फायर टॅक्स पालिकेच्या स्थायी समितीत मंजूर झाल्यावर मुंबईकराना कराचा बोजा सहन करावा लागणार आहे. हा फायर टॅक्स राज्यसरकारन सुचित केलेल्या 3 टक्के अग्निशमन फी पेक्षा अधिक असल्यामुळे याला विरोध करण्याचा इशारा काँग्रेस नगरसेवकांनी दिलाय.
एकीकडे महागाईचे चटके यात पालिकेची वाढीव पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्सनं नागरिक आधीच पिचलेत. त्यात आता फायर टॅक्समुळे मुंबईकरांच आर्थिक ताळेबंद बिघडणार यात शंक नाही.