'राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर..'; फडणवीसांनी सांगितलं BJP-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण

Fadnavis On Why No Alliance With Raj Thackeray MNS: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर मागील काही दिवसांमध्ये अनेकदा देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील असं विधान केलं आहे. मात्र मनसे इतका पाठिंबा दर्शवत असताना मनसे आणि भाजपाची युती का झाली नाही? याबद्दल फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 15, 2024, 09:29 AM IST
'राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर..'; फडणवीसांनी सांगितलं BJP-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण
विशेष मुलाखतीत नोंदवलं मत

Fadnavis On Why No Alliance With Raj Thackeray MNS: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही या निवडणुकीमध्ये जोरदार चर्चा आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सभा घेत आपल्याला जनतेनं एकदा संधी द्यावी असं सांगत आहेत. राज ठाकरेंनी 138 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. राज ठाकरेंच्या प्रचाराचा जोर हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरील टीकेवर असला तरी भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांची भूमिका मवाळ दिसत आहे. मध्यंतरी मनसे आणि भाजपा युती करणार अशी जोरदार चर्चा होती. फडणवीस आणि राज यांच्या मध्यंतरी अनेकदा भेटीगाठीही झाल्या होत्या. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र निवडणूक लढवणारच अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि दोन्ही पक्षांनी वेगवगळं निवडणूक लढवण्याचं ठरवलं. मात्र दोघांमधील युती का फिस्कटली यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. 

Add Zee News as a Preferred Source

दादर-माहीमचा पेच सोडवण्यासाठी देण्यात आलेली ही ऑफर पण...

'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट' या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यावेळेस त्यांनी दादर-माहीम मतदारसंघातील मनसे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेमधील लढतीबद्दलही भाष्य केलं. माहिममधील गोंधळ सोडवण्यासाठी आपण स्वत: आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. आम्ही दोघांनी प्रयत्न केला असं सांगतानाच फडणवीसांनी, " परिषदेवर घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सारवणकर यांना सांगितलं होतं. मात्र सारवणकर यांचं लॉजिक शिंदेंना पटलं," असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, "अमितला परिषदेवर घेऊ अशी ऑफर होती पण ते ठाकरे आहेत ते म्हणाले तुम्हाला द्यायचा उमेदवार तर द्या," असं सांगण्यात आल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> रमेश वांजळेंचा शेवटचा फोन राज ठाकरेंना! स्वत: खुलासा करत म्हणाले, "तो मला म्हणाला, मी..."

भाजपा मनसेची युती का झाली हे ही सांगितलं

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि मनसेची युती का झाली नाही याबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केलं. राज ठाकरेंना सोबत न घेण्यामागील कारण हे जागवाटपाचं असल्याचं फडणवीसांनी सूचित केलं. "राज ठाकरेंना सोबत घेतलं असतं तर फार जागा देऊ शकलो नसतो," असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना मनसेची वाढ होण्यासाठी निवडणूक लढवणं आवश्यक होतं, असं फडणवीसांनी सूचित केलं. "निवडणूक नाही लढवली तर पक्ष वाढणार कसा?" असा उलट सवाल फडणवीसांनी विचारला. तसेच कोणत्या एका मुद्द्यावर भाजपा आणि मनसे एकत्र आहे याबद्दलही फडणवीसांनी मुलाखतीत भाष्य केलं. "आम्ही हिंदुत्वावर एकत्र आहोत," असं फडणवीस म्हणाले. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More