www.24taas.com, मुंबई
मुंबई शेअरबाजार १७ हजार १११ सेन्सेक्सवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार ५ हजार १९९ निफ्टी निर्देशकांवर खुला झाला..मागच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १३५ अंशाची घट होताना दिसतेय...तर निफ्टीमध्येही ४४अंशाची घट होताना दिसतेय...डॉलरच्या तुलनेत रूपया आज ५१ पूर्णांक ५३ अंशावर उघडलाय..कालच्या तुलनेत रूपया शून्य पूर्णांक ७ अंशांनी घसरला आहे.
काल शेअरबाजार बंद होतानाचं चित्र, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स काल १७ हजार २४३ अंशांवर बंद झाला त्यात२१ अंशांची वाढ पहायला मिळाली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी काल ५ हजार २४३ अंशांवर बंद झाला. त्यात ९ अंशांची वाढ झाली. काल सकाळी शेअरबाजार मागच्या तुलनेत किंचीत वरच्या पातळीवर उघडला होता. काल सकाळच्या सत्रात बाजारात वाढ पहायला मिळाली होती. मात्र, युरोपीयन बाजार खालच्या पातळीवर उघडल्यामुळे दुपारी भारतीय बाजारात घट झाली.
अखेरच्या सत्रात बाजारात सकारात्मक बदल दिसून आला होता आणि शेवटी तो तुलनेनं किंचीत वरच्या पातळीवर स्थिरावला. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डानं, नेटवर्क टॅरिफ तसचं सीएनजीचे कॉम्प्रेशन दर कमी केल्यामुळे गॅस कंपन्यांचे स्टॉक्स घटले होते. इंद्रप्रस्थ गॅस आणि गेल इंडियानं काल ५२ आठवड्यातला नीचांक नोंदवला. व्याजदराबाबत संवेदनशील असणा-या रिएलिटी स्टॉक्समध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेली घसरण काल थांबली. एटो स्टॉक्स संमिश्र होते. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्राच्या विक्रीत वाढ झाली तर मारूती सुझुकीचे शेअर्स घटलेले होते. हेवीवेट रिलायन्सचे भाव काल स्थिर होते. रिफायनींगच्या नफ्यात घट आणि केजी-डी सिक्स गॅस ब्लॉकचं घटलेल्या उत्पादनामुळे रिलायन्सची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याचं सांगण्यात येतं होतं.
पावसाचं वेळेवर आगमन होणार असल्याच्या वृत्तामुळे काल हिंदुस्थान लिव्हरसारख्या ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांचे स्टॉक्स वाढले होते. सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसीनं काल उच्चांक नोंदवला तर भांडवली वस्तू उत्पादक कंपन्यांचे स्टॉक्स घटले होते. काल टाटा पॉवर, टाटा मोटर्स, एचयूएल, एसबीआय, आयटीसी या कंपन्यांचे शेअर्स वधारलेले होते, तर भेल, गेल, इन्फोसिस, ओएनजीसी, स्टर्लाईट इंडिया या कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.