रिक्षाचालकांच्या मुजोरीला मनसेचा 'ब्रेक'

रिक्षावाल्यांच्या त्रासामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांची दुखरी नस पकडत राज यांनी रिक्षावाल्यांच्या प्रश्नावर मनसेची भूमिका मांडली.

Updated: Oct 4, 2011, 01:56 PM IST

रिक्षावाल्यांची मुजोरी आता सहन करण्यापलिकडे गेली आहे. मीटरमध्ये फेरफार करून लोकांना लुटायचे. जवळची भाडी नाकारायची आणि वर शहाणपणा करत संपाची भाषा करायची. त्यामुळे आता बस्स झाले, उद्यापासून लोकांचा राग काय असतो ते पाहा... अशी तंबी राज ठाकरे यांनी रिक्षावाल्यांना दिली.
रिक्षावाल्यांच्या त्रासामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांची दुखरी नस राज यांनी मंगळवारी अचूक पकडली. रिक्षावाल्यांच्या प्रश्नावर मनसेची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद बोलावली होती.
शरद राव सतत संपाद्वारे लोकांना वेठीस धरत आहे. कधी महापालिकेचा संप, कधी टॅक्सीचा संप, कधी बेस्टचा संप आणि आता रिक्षाचा संप. असा सतत लोकांना त्रास देत राहिलात तर शरद रावांना घरातूनही बाहेर पडणे अवघड होईल, असा आवाजही राज यांनी यावेळी दिला.
रिक्षावाल्यांच्या मागण्या योग्यही असतील , पण लोकांना वेठीस धरू नका. मीटरमधले फेरफार नको, इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करा. जवळचे असो वा लांबचे कोणतेही भाडे नाकारू नका. हे सारे आमचे म्हणणे नाही, वाहतूक विभागाचे नियम आहेत. ते कायदे पाळले जावेत, अन्यथा कायदा हाती घेतला तर बोलू नका, अशी भूमिका त्यांनी मांडली.
स्थानिक-परप्रांतीय मुद्दा यातही स्पष्ट करत ते म्हणाले की, रिक्षा चालवणारे कोण आहेत ? ते अधिकृत आहेत की अनधिकृत ? याची तपासणी करा. मी खात्रीने सांगतो ही मुजोरी करणारे रिक्षावाले परप्रांतीय आहेत. म्हणून अबू आझमींसारखी लोक यांची बाजू उचलतात. खरं तर यात कोणतेही राजकारण करण्याचा भाग नाही. हा लोकांचा मुद्दा आहे, आणि लोकच काय ते ठरवतील.
या प्रश्नाला जेवढे रिक्षावाले दोषी आहेत, तेवढेच आरटीओचे अधिकारीही जबाबदार आहेत. दुर्दैवाने ते मराठी आहेत. हेच अधिकारी चिरमिरी खाण्यासाठी या नियमांचा चुराडा करतात. त्यामुळे त्यांनाही मनसेचे कार्यकर्ते भेटतील, असे राज यांनी सांगितले.

Tags: